गोंदिया: शौचालय बांधकामाची मुदत 5 मार्च पर्यंत, 7461 लाभार्थ्यांना 12 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान

452 Views

 

प्रतिनिधि।
गोंदिया, ता. 22 : गावे पूर्णत: हागणदारीमुक्त व्हावी, यासाठी प्रत्येक कुटूंबाला शौचालय देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्हयात अशा 7461 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली, असून या लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाची अंतिम मुदत 5 मार्च पर्यंत प्रदान करण्यात आलेली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत प्रत्येक गाव आणि गावातील प्रत्येक घरी शौचालय देण्याचे शासनाचे धोरण आहे. सन 2012 च्या पायाभूत सर्व्हेक्षणांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शौचालयांचा लाभ देवून संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. दरम्यान पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या (LOB ) आणि त्यानंतर गावातील एकही घर शौचालय विना सुटू नये (NOLB) या दोन उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शौचालयांचा लाभ प्रदान करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा-2 ला सुरवात करण्यात आली. त्यानुसार गावातील वाढलेल्या तथा शौचालय नसलेल्या 7461 कुटूंबियांची वैयक्तीक शौचालयांसाठी निवड करण्यात आली आहे. पात्र कुटूंबाला यापूर्वीच शौचालय बांधकामाचे निर्देश देण्यात आले. त्यातील 1343 लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले. 6118 लाभार्थ्यांचे शौचालयांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. या सर्व लाभार्थ्यांना येत्या 5 मार्च पर्यंत वैयक्तीक शौचालय बांधकाम करण्याची मुदत प्रदान करण्यात आली असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नरेश भांडारकर यांनी कळविले आहे. शौचालयांचे बांधकाम करून त्याचा वापर करणाऱ्या लाभार्थ्यांना 12 हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. दरम्यान जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना आपल्याकडील वैयक्तीक शोचालयाचे बांधकाम करून त्याची माहिती ग्रामपंचायतीला देण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नरेश भांडारकर यांनी केले आहे.
——-
अनुदानासाठी व्हावी नोंद
शौचालयांचे बांधकाम झाल्यानंतर त्याची शासनाच्या संकेतस्थळावर नोंद केली जाते. त्यानंतरच लाभार्थ्यांना ग्रामपंचायत अंतर्गत रुपये 12 हजाराचे अनुदान प्रदान केले जाते. वैयक्तीक शौचालय आपल्या व आपल्या कुटूंबियांच्या सोयीसाठी गरजेचेच आहे. त्यामुळे जिल्हयातील लाभार्थ्यांनी लवकरात लवकर वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करून प्रोत्साहन निधी प्राप्त करावे.
——
गुडमार्निंग पथक सज्ज
प्रत्येक कुटूंबाकडे शौचालय असावे, शौचालयांचा वापर व्हावा, यासाठी शासन प्रशासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जातात. मात्र, काही कुटूंब जाणिवपूर्वक शौचालयांचा वापर करीत नाही. काही कुटूंब पात्र असूनही शौचालयांचे बांधकाम करीत नाहीत. गावात उघडयावर शौचास जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. दरम्यान गोंदिया जिल्हयात 5 मार्च नंतर गुडमार्निंग पथक कार्यरत करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर करावा. गुडमार्निंग पथकाला उघडयावर शौच करतांना आढळलयास बाराशे रुपयांचा दंड ठोठाविला जाणार असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तर्फे कळविण्यात आले आहे.

Related posts