796 Views
22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान अधिवेशन..
नागपुर। 21 डीसेंबर
उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून (बुधवार) सुरु होत असून, हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक आहेत. त्यातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. याचसोबत टीईटी परीक्षा घोटाळा, म्हाडा पेपर फुटी प्रकरण यासारख्या मुद्यावरून भाजप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसांपासून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून, अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा मास्टर प्लॅन भाजप आखत आहे. कमी कालावधीचे अधिवेशन असले तरी या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे.
22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान अधिवेशन…
यंदाच्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरला सुरुवात होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. कार्यकाळ जरी सात दिवासांचा वाटत असला तरी शनिवार आणि रविवारमुळे हे अधिवेशन अवघ्या पाचच दिवसांचं असणार आहे. हे अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या विविध मुद्यांवरुन राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना सुरु आहे. अशातच आता पुन्हा एकदा सभागृहात ठाकरे आणि फडणवीस आमने-सामने येणार आहेत.