गोंदिया (ता.30) सध्या जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून लवकरच ठरलेल्या वेळेवर या निवडणुका पार पडणार आहेत. या दरम्यान गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच गावातील शांततेला गालबोट लागू नये म्हणून गावातील पोलीस पाटलांनी सतर्क राहून कार्य करावे असे आव्हाहन गोंदिया ग्रामीण चे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी व्यक्त केले. ते सोमवारी (ता.29)ग्रामीण पोलिस स्टेशन च्या प्रांगणात आयोजित पोलीस पाटलांच्या मासिक आढावा सभेत बोलत होते.
निवडणूक काळात अनेक गावात असामाजिक तत्त्व उदयास येऊन ते गावातील शांततेला गालबोट लावीत असतात.त्यातच निवडणूक काळात गावातील नागरिकांचे तंटे निर्माण होऊन त्यातून जबर घटना घडत असतात. या घटना थांबविण्यासाठी तसेच गावातील शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी केवळ पोलीस पाटलांनीच नव्हे तर गावातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी जागरूक होऊन प्रशासनाची मदत करावी असे आवाहनही बोरसे यांनी यावेळी केले.
याखेरीज निवडणूक काळात जर कुणीही समाजकंटकानी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सभेला ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावचे पोलीस पाटील आवर्जून उपस्थित होते. सभेचे संचालन रवींद्र बिसेन यांनी तर आभार मंगला तिडके यांनी मानिले.