माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती
10 हजार कर्मचारी साधणार गृहभेटीतून संवाद
प्रतिनिधि।
गोंदिया दि 30 (जिमाका) कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सर्व्हेक्षण करण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही हे सर्व्हेक्षण करण्यात येत असून 3 ऑक्टोबर या दिवशी जिल्ह्यातील एक लाख कुटूंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली.
आज 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, राज्य शासनाची ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही महत्वाकांक्षी मोहिम आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक दृष्टीकोनातून जबाबदारीने काम करावे. या मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये सकारात्मक संदेश जायला पाहिजे. या मोहिमेत सरपंच, ग्रामसेवक यांचा सुध्दा सहभाग घेण्यात यावा. सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती करुन ही मोहिम यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण राज्यात कोविड-19 या आजाराची संख्या वाढत आहे. ग्रीन झोनमधील गोंदिया जिल्हा सुध्दा आता रेड झोनमध्ये आलेला आहे. अनलॉक सुरु असतांना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावी करण्याचे राज्याचे धोरण आहे. विशेष म्हणाजे, या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिक्षणावर भर देण्यासह मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार आणि लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्ती सुध्दा शोधल्या जाणार आहेत. लोकांना कोविड साक्षर करण्याच्या या मोहिमेत शासकीय कर्मचारी, क्रिडा मंडळ, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, बचतगट, व्यापारी संघटना, राजकीय प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा एकूण 10 हजार लोकांच्या सहकार्याने गृहभेटी करण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.
एका दिवसाच्या या थेट भेट उपक्रमाला 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात येईल. एका कुटूंबाला भेट दिल्यानंतर त्या कुटूंबाने शेजारच्या 10 कुटूंबांना अभियानाची माहिती पोहचवावी असे आवाहन त्याचवेळी करण्यात येईल. त्यामुळे साधारणत: 10 लक्ष लोकांपर्यंत एकाच दिवसात उपक्रम पोहोचेल. घरोघरी माहिती देण्याच्या या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागातर्फे भेट देणाऱ्या व्यक्तीला माहितीचे एक लेखी नोट प्रदान केले जाणार आहे. भेट देणारा व्यक्ती भेट दिलेल्या कुटूंबाची नोंद ठेवणार आहे. त्यासाठी विशेष प्रपत्र सुध्दा तयार करण्यात आले आहे. गृहभेटी करतांना शारिरीक अंतर ठेवणे, कुटूंब प्रमुखाला घराबाहेर बोलावून त्यांना माहिती देण्यावर भर देण्यात येईल. हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीला आरोग्य साक्षर करण्यासाठी असल्याने अनेक व्यक्तींना स्वयंस्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होता येईल. विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे.
सभेला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राहूल खांदेभराड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नरेश भांडारकर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, गोंदिया नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी अर्चना मेन्ढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे,गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, सडक/अर्जुनी तहसिलदार उषा चौधरी, तिरोडा तहसिलदार प्रशांत घोरुडे, गोरेगावचे प्रभारी तहसिलदार श्री वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.
00000