गोंदिया: कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता प्रशासन सज्ज, “जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केली रुग्णालयांची पाहणी.”

273 Views

 

प्रतिनिधि। 17 जुलाई

गोंदिया। कोविडच्या तिसऱ्या लाटेचा पूर्ण क्षमतेने सामना करता यावा याकरिता आज दिनांक 17 जुलै रोजी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, के टी एस रुग्णालय गोंदिया, जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड उपचार केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे भेट दिली.

आपल्या भेटी दरम्यान जिल्‍हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला पूर्ण क्षमतेने करता यावा याकरिता पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यात यावी, औषध साठा पुरेशा प्रमाणामध्ये करून ठेवण्यात यावा तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना अपाय होऊ शकतो ही बाब विचारात घेता लहान बालकांना उपचार देता यावा याकरिता स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा अशा सूचना श्रीमती नयना गुंडे यांनी यावेळी उपस्थित असणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
जिल्हाधिकारी यांच्या या पाहणी प्रसंगी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर नरेश तिरपुडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अम्बरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन कापसे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वतः कोविडचा सामना करण्याकरिता पाहणी करत असल्यामुळे अनेक समस्यांचे जागच्याजागी निराकरण होत असल्याचे यावेळी दिसून आले. जिल्हाधिकारी यांच्या या दौरा कार्यक्रमामुळे गोंदिया जिल्हा प्रशासन कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना सक्षमपणे करू शकेल असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलेला आहे.

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये. नागरिकांनी कोविडचा प्रसार होणार नाही याकरिता राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या बाबीकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.
नयना गुंडे
जिल्हाधिकारी गोंदिया

Related posts