युती-आघाडीची चिंता न करता कामाला लागा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखांना आदेश

267 Views

 

प्रतिनिधि।
मुंबई – शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरु करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शुक्रवार 09 जुले शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.

युती आघाडीची चिंता न करता पक्ष विस्तारा साठी कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना असे आदेश देऊन शिवसेनेनं स्वबळाची जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसतंय. येत्या वर्षभरात 20 महापालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 300 नगरपालिका तसेच 325 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. ही जवळपास विधानसभेची रंगीत तालीमच असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी युती किंवा आघाडी होईल किंवा नाही, या काळजीत न पडता पूर्ण ताकदीनं तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आणि केंद्र सरकारची असलेली वक्रदृष्टी बघता कुठल्याही स्थितीला सामोरं जाण्यासाठी सत्तेत असतानाच पक्षाचीजोरदार बांधणी करण्याची शिवसेनेची तयारी दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावा-गावात शिवसेना पोहोचण्यासाठी शिव संपर्क मोहीम सुरू करा, असा आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. शिव संपर्क अभियान 12 जुलै ते 24 जुलै पार पडणार आहे. ‘माझं गाव कोरोनामुक्त गाव’ आपल्या गावात ही मोहीम प्रत्येक शाखा प्रमुखांनी राबवावी. महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात बैठका घ्या, अशा सूचना शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती आहे.

Related posts