थकीत बोनस देण्याबाबत व रब्बी धान खरेदी करीता काढलेले परिपत्रक रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार- आ.डॉ परिणय फुके यांचा इशारा

347 Views

 

प्रतिनिधि

मुंबई (०१ जुन) : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतक-यांना थकीत असलेला बोनस देणे, धानाची उचल करणे व रब्बी धान खरेदीसाठी काढलेला अन्यायकारक परिपत्रक त्वरित रद्द करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज आमदार डॉ परिणय फुके यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना दिले.

एकीकडे कोविडमुळे संपुर्ण राज्यात हाहाकार माजला असतांना दुसरीकडे कोविडच्या काळामध्ये शेतक-यांची कुचंबना होत आहे. पुर्व विदर्भ हा तांदळा करीता प्रसिध्द आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप व रब्बी अश्या दोन हंगामामध्ये धानाचे पिक घेत असतात. शेतक-यांचा आर्थिक कणा म्हणजे धानाचे उत्पादन असल्यामुळे वेळेवर धान खरेदी होणे, बोनस मिळणे अपेक्षित असते. धान खरेदी ची संपूर्ण प्रक्रिया ही केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असते. राज्य शासन एक नोडल एजेन्सी म्हणून यावर नियंत्रण ठेवत असते. परंतु मागील सहा महिन्यापासुन खरीप हंगामातील धानाची उचल मिलर्सनी न केल्यामुळे गोडावून मध्ये धान पडून आहे. अजुनपर्यंत शेतक-यांना खरीप हंगामातील धानाचे बोनस सुध्दा मिळालेले नाही. अशातच रब्बी हंगामातील धानाचे पिक सुध्दा घेण्याची वेळ आली असतांना शासनाने १९ मे रोजी एक तुघलकी परिपत्रक काढुन ३१ मे पर्यंत नोंद केलेल्या शेतक-यांचे धान घेणे बंधनकारक नसल्याचे नमुद केले. त्यामुळे शेतक-यांनी आपली व्यथा आमदार डॉ परिणय फुके यांच्याकडे मांडली. शेतक-यांच्या धानाची खरेदी, थकीत बोनस व रब्बी हंगामातील धान उचल करण्याकरीता १९ मे चा परिपत्रक त्वरित रद्द करावे अशी मागणी आ.फुके यांनी ना.छ्गन भुजबळ यांच्याकडे केली.

यावेळी ना.छगन भुजबळ यांनी लवकरच अधिका-यांची बैठक घेवून तात्काळ धानाची खरेदी, थकीत बोनस व रब्बी हंगामातील धान उचल करण्याकरीता काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

खरीप हंगाम सुरू होण्यापुर्वी शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास आपण शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरण्यासही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा सुध्दा आमदार डॉ परिणय फुके यांनी दिला.

Related posts