गोंदिया: धानाचे चुकाऱ्यांसाठी ३१२ काेटी रुपयांचा निधी झाला जमा, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रारंभ

1,793 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चुकारे तीन महिन्यापासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. ही बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा केली. सोमवारी (दि.३) चुकाऱ्यांसाठी ३१२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाला आहे.

शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी १७० कोटी ७७ लाख तर गोंदिया जिल्ह्यासाठी १४२ कोटी ३ लाख रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खात्यावर सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थकीत चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खरीप जिल्ह्यातील दीड लाखांवर शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रावर धानाची विक्री केली होती. मात्र यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचे चुकारे मागील दोन तीन महिन्यापासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. त्यातच सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने उद्योग धंदे सर्वच ठप्प आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सुध्दा बसला होता. ही बाब माजी आ. राजेंद्र जैन व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर त्यांनी २७ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा करुन त्वरित निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आवश्वासन दिले होते. त्याचीच पुर्तता करीत सोमवारी शासनाने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ३१२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त करुन दिला आहे. परिणामी शेतकऱ्यांची समस्या दूर झाली आहे. माजी आ. राजेंद्र जैन यांनी थकीत चुकारे शेतकऱ्यांना त्वरित मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. चुकारे मिळण्यास प्रारंभ झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे आभार मानले आहे.

…..

बोनसची रक्कम येणार लवकरच

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. पण धान विक्री करुन पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही ही रक्कम प्राप्त झाली नव्हती. यासंदर्भात सुध्दा खा. पटेल यांनी चर्चा केली असून लवकरच बोनसची रक्कम सुध्दा जमा होणार आहे.

Related posts