प्रभागामध्ये बिनविरोध निवडून आल्यावर देणार 5 लाख रूपयांची विकास निधि…
प्रतिनिधि।
गोंदिया विधानसभा क्षेत्रात ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होईल त्यांना आ. विनोद अग्रवाल स्थानिक विकास निधीमधून २१ लाख रुपये विकास निधी देणार आहेत. त्याच बरोबर ज्या गावात ग्राम पंचायत सदस्यांसाठी बिनविरोध उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या गावासाठी 5 लक्ष रुपये स्थानिक विकास निधी देणार असल्याचे अमदसर विनोद अग्रवाल यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीची अभिनव संकल्पना समोर आली आहे.
जागतिक महामारी कोरोनामुळे गोंदिया तालुक्यांची मोठी हानी झाली आहे. अजूनही कोरोनाचा धोका संपला नाही, जनसामान्यांना कोरोना, अतिवृष्टीचा आर्थिक फटका बसल्याने त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या पाश्र्वभूमीवर येत्या २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायतचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
15 जानेवारी ला मतदान पडणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतींना आर्थिक झळ लागू नये, यासाठी आमदार विनोद अग्रवाल गोंदिया तालुक्यांत ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होईल, त्यांना २१ लाख रुपये विकास निधी तर ज्या ग्राम पंचायत सदस्यांसाठी बिनविरोध निवड होणार आहे त्या ठिकाणी 5 लक्ष रुपयांची स्थानिक विकास निधी देणार आहेत.
निवडणूक काळात ग्रामपंचायतमध्ये आपल्या गावातील वादविवाद गट-तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, गावातील होतकरू निव्र्यसनी युवकांना समोर आणावे. शिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती असणा-या तरुणांनी व सर्व ज्येष्ठांनी आपल्या गावासाठी प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल. गावाचा विकास आराखडा तयार करून त्या माध्यमाने गावाचा सर्वांगीण विकास घडविण्याचे कार्य केले जाईल असे आ. अग्रवाल यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्षांची विचारसरणी सोबत आहेच. परंतु गाव आपला आहे, आपणच आपल्या गावाचा विकास करायचा आहे ही संकल्पना लक्षात घेऊन टोकाचा विचार न करता ज्या कुठल्या पद्धतीने गावाच्या विकासासाठी गावामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध करता येऊ शकेल यावर विचार सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे, असेही ते म्हणाले.