NH हायवेच्या प्रश्नांवर खा. प्रफुल पटेल यांची अधिकाऱ्यांशी बैठक, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश

239 Views

नागपुर। भंडारा–गोंदिया जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना खासदार श्री प्रफुल पटेल यांनी पक्ष कार्यकर्ते व नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध सूचना आणि राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित समस्यांवर गांभीर्याने दखल घेतली. दिनांक ८ एप्रिल रोजी नागपूर येथे त्यांनी नॅशनल हायवेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

खासदार श्री पटेल हे नेहमीच भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या हिताचा विचार करत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

दरम्यान नागपूर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विविध महत्त्वाच्या कामांवर चर्चा केली. यामध्ये कोहमारा ते गोंदिया रस्त्याचे चार पदरी कॉंक्रीटीकरण करणे, गोंदिया–तिरोडा मार्गावरील काचेवानीजवळील उड्डाणपूल तातडीने पूर्ण करणे, तसेच गोंदिया शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भागवतटोला ढाकणीं– नगपुरामूरी – पिंडकेपार कोहमारा नवीन मार्गिका काढणे.याशिवाय रावणवाडी–कामठा– आमगाव–कोहमारा या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ शी जोडणाऱ्या बाह्य वळण मार्गाचा DPR तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. सारस चौक ते फुलचूर नाका या रस्त्याचे बांधकाम व विद्युतीकरण लवकर पूर्ण करणे, तसेच बालाघाट टी-पॉईंट, मरारटोली–तिरोडा रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलांच्या प्रस्तावित कामांच्या त्रुटी दूर करून गती देण्यावर भर देण्यात आला. वरील सर्व प्रलंबित कामांमधील त्रुटी दूर करून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना खासदार श्री प्रफुल पटेल यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Related posts