‘न्याय तुमच्या दारी’ हा विधी सेवा महाशिबिराचा मुख्य उद्देश – न्यायमूर्ती ए. एस. किलोर

69 Views

गोंदिया, दि.18 : ‘न्याय तुमच्या दारी’ हा विधी सेवा महाशिबिराचा मुख्य उद्देश असून या उद्देशाची फलश्रुती करून शेवटच्या नागरिकांपर्यंत न्याय पोहोचेल तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल यासाठी शासनातील प्रत्येक यंत्रणांनी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी आज झालेल्या विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा या कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी संघटनेचे कौतुकही केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, जिल्हा न्यायालय गोंदिया व जिल्हा प्रशासन गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती  ए. एस. किलोर बोलत होते.

या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती न्यायिक एम.डब्ल्यू. चांदवाणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आर. एन. जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम.,पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. टि. बी. कटरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे कार्यालयीन प्रमुख अधिकारी, स्थानिक वकील संघ, विधी कॉलेजची विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायमूर्ती किलोर पुढे म्हणाले, प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाअंतर्गत मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. मात्र, तळागाळातील नागरिकास ज्ञानाअभावी लाभ उचलता येत नाही. त्याकरिता अशा आयोजित महा शिबिराच्या माध्यमातून थेट नागरिकास लाभ होतो.

या ठिकाणी शासनाच्या विविध विभागाचे दालन आहेत, ही आनंदाची बाब आहे. शासनाच्या विभागांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविल्याने अशा कार्यक्रमांना यश निश्चित मिळते.

न्यायाधीश आणि नागरिक यामध्ये असणारा दुरावा अशा महाशिबिराच्या माध्यमातून कमी होत असतो. अशा महाशिबिरांमध्ये न्यायदान प्रक्रियेत सक्रिय असणाऱ्या न्यायाधीशांना साध्या ड्रेसमध्ये येण्याच्या विनंतीला मान देत साध्या ड्रेसमध्ये आलेत त्यासाठी त्यांचे अभिनंदनही यावेळी श्री. किलोर यांनी केले.

‘न्यायदूत योजना’ वकिलांसाठी राबवली असून याचाही लाभ नागरिकांना पोहोचत असल्याचे सांगून एका गावात शिबिर आयोजित केल्यास दहा गावात त्याचा लाभ होतो. यामध्ये स्थानिक प्रशासनाचे सहकार्य लाभते. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत असल्याचे श्री. किलोर यावेळी म्हणाले. अशाप्रकारचे महाशिबीर हे जिल्ह्यातील छोट्या गावात आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

गोंदिया जिल्ह्यातील न्यायालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेने मासिक जमा निधीतून गरजू लोकांना मदतीचा हात देऊन लोकोपयोगी एक चांगला उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. याबद्दलची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या विधी सेवा विभागाला देण्यात यावी, अशीही सूचना त्यांनी मंचावरून केली. जिल्ह्यातील सालेकसा तालुकास्तरीय न्यायालयाच्या भूमी अधिग्रहणाचे कामाला गती मिळेल. तर गोरेगाव येथेही न्यायालय उभारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोंदिया जिल्ह्याचे भूमीपूत्र असलेले न्यायमूर्ती चांदवाणी यांनी आपल्या जमिनीची नाळ कायम ठेवली असून जिल्ह्यातील गोरेगाव आणि सालेकसा येथे तालुकास्तरीय होणाऱ्या न्यायालयाच्या बांधकामा बाबतच्या प्रस्तावास पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. श्री. चांदवाणी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना भारतीय संविधानात महिला, पुरुष, बालक, वृद्ध या सर्वांना मूलभूत अधिकारासह त्यांच्या हिताचे रक्षणाची जबाबदारी निश्चित करते. अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासनाची असून काही वेळेला नागरिकांना पुरेसा लाभ मिळत नाही म्हणून अशा प्रकारच्या महा शिबिराचे आयोजन नागरिकांसाठी लाभदायी ठरत असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती चंदवाणी यांनी यावेळी केले.

न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा उद्देश हा नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याचा असून आज या कार्यक्रमात विविध योजनांचे 40 स्टॉल्स उभारण्यात आले असल्याची माहिती दिली. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच खाजगी मोठ्या रुग्णालयात सामान्य जनतेसाठी काही बेड्स राखीव ठेवले जातात. कागदपत्र योग्य असल्यास त्याचा लाभ उचलता येतो, त्यामुळे आपल्या अधिकाराची जाणीव ठेवून नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. गोंदिया जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजची निर्मिती ही न्यायिक प्रक्रियेतून झाली असून न्यायदानाच्या या प्रक्रियेत न्यायमूर्ती किलोर यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related posts