धरणे आंदोलनासाठी जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच गोंदिया टू मुंबईकडे रवाना..28 ऑगस्टला आझाद मैदानात महाआंदोलन

1,296 Views

 

राज्यभरातील हजारो सरपंच उपसरपंच होणार सहभागी, तब्बल 11 दिवसांपासून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प..

गोंदिया: अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकारातून आपल्या विविध मागण्यांना घेऊन राज्यभरातील सरपंच, उपसरपंच यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून तब्बल 11 दिवसांपासून राज्यातील गावगाडा ठप्प आहे. परंतु शासनाने दखल न घेतल्याने अखेर मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो सरपंच, उपसरपंच मुंबई कडे रवाना झाले आहेत.


मुंबई येथील आंदोलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात बैठकांचे आयोजन करून आंदोलनाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खासगी ट्रॅव्हल, चारचाकी वाहनांसह रेल्वेने मोठ्या संख्येने सरपंच उपसरपंच रवाना होऊ लागले आहेत. विकासाच्या बाबतीत शासनाकडून नेहमीच शहर आणि गावखेडे यात प्रचंड भेदभाव केला जातो, यात शहरांना झुकते माप तर खेड्याकडे दुर्लक्ष केले जाते, अलीकडेच ग्राम पंचायतीच्या ३ लाखावरील विकासकामांना कात्री लावली आहे, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे, रोजगार हमी योजनेची देयके मिळालेली नाहीत, घरकुल योजनांचे अनुदान आलेले नाही, ग्रामीण जिल्हा परिषद रस्त्यांचे बेहाल आहेत या सर्व समस्यांना शासन प्रशासन जबाबदार असताना ग्रामीण जनतेचा रोष मात्र सरपंच, उपसरपंच यांना सहन करावा लागत आहे. हा भेदभाव बाजूला सारून शहरांप्रमाणेच गवखेड्याना विकासात प्राधान्य देण्यात यावे यासह अनेक मागण्यांना घेऊन मागील 11 दिवसांपासून राज्यभरात सरपंच, उपसरपंच यांचा लढा सुरू असून शासनाच्या अनेक योजना, शासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, मार्गदर्शक गंगाधर परशूरामकर, दादा संग्रामे, विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा उपाध्यक्ष मनीष गहेरवार, धर्मराज पाथोडे, जिल्हा सचिव ऍड.हेमलता चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा पटले, उपाध्यक्ष योगेश्वरी चौधरी, गोंदिया तालुकाध्यक्ष सोनू घरडे, सालेकसा तालुकाध्यक्ष रामेश्वर कटरे, सचिव गौरीशंकर बिसेन, देवरी तालुकाध्यक्ष मनोहर राऊत, सचिव कैलाश मरस्कोल्हे, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष हर्ष मोदी, सचिव विलास वट्टी, आमगांव तालुकाध्यक्ष मुकेश शिवनकर सचिव खेमेंद्र रिनायत,अर्जुन मोरगांव तालुकाध्यक भोजराज लोगडे, सचिव लक्ष्मीकांत नाकाडे, तिरोड़ा तालुकाध्यक्ष विनोद लिल्हारे, गोरेगाव तालुकाध्यक्ष नरेंद्र चौरागडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो सरपंच उपसरपंच यात सहभागी होत असल्यामुळे आंदोलन ऐतिहासिक होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांनी कळविले आहे.

ग्रामपंचायतींची गळचेपी सहन करणार नाही

दिवसेंदिवस ग्राम पंचायतींच्या अधिकारावर कात्री लावून गळचेपी करण्याचे कट कारस्थान होत आहे. हक्काचा आणि स्वाभिमानाचा हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहील. देशाचा विकास साधायचा असेल तर शासनाला ग्रामपंचायतींना सक्षम करावेच लागेल आणि नेमका यासाठी आमचा लढा सुरू आहे.
चंद्रकुमार बहेकार, जिल्हाध्यक्ष: अखिल भारतीय सरपंच परिषद गोंदिया.

Related posts