23 नोव्हेंबरपासून सुरु होणार जिल्ह्यातील शाळा…इयत्ता 9 वी ते 12 वीच्या वर्गात विद्यार्थ्यांची राहणार उपस्थिती

351 Views

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार

      गोंदिया। राज्यात 13 मार्च 2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात विविध आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत व सद्यस्थितीत सदर आदेशाच्या तरतूदी जिल्ह्यात लागू आहेत. शासनाकडून शालेय शिक्षण पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेले आहे. त्यानुसार इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासन परिपत्रक व पत्रातील निर्देशांच्या अधिन राहून जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी शासन निर्देशाप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील सीमाक्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन वगळून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेली शाळा/विद्यालये येथील इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच इयत्ता 9 वी ते 12 वीचे वसतिगृह व आश्रमशाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
        कोविड-19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. आदेशाचे पालन न करणारी/उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी काढलेल्या आदेशात विविध बाबी नमूद केल्या आहे.
         शाळा सुरु करण्यापूर्वी शाळेत स्वच्छता व निर्जुंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे. शिक्षकांची कोविड-19 बाबतची तपासणी करणे. कार्यगट गठीत करणे. बैठक व्यवस्था सुनिश्चित करणे. शारिरीक अंतरच्या नियमांच्या अंमलबजावणीकरीता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करण्यात यावे. तसेच शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध असेल. पालकांची संमती घेण्यात यावी. विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-19 च्या संदर्भातील आवाहने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुकता निर्माण करावी. शाळेतील उपस्थिती व वैद्यकीय रजा याबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करुन माहितीचे एकत्रिकरण करावे असे आदेशीत केले आहे.
        शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखून शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षीत ठेवणे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत प्रवासाची सोय करणे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षीत प्रवेश व गमन सुनिश्चित करणे. वर्गखोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करणे. अभ्यासवर्गाची व्यवस्था करणे व कोविड-19 संशयीत आढळल्यास त्वरित दखल घेवून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावे असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना (SOP) च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत शाळा, महाविद्यालय, संस्था यांना दिले आहे।

Related posts