गोंदिया: अटी व शर्तीच्या अधिन राहून, श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन, शोभायात्रा ला दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर

396 Views

       गोंदिया, दि.27 : ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकांचा वापर श्रोतेगृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने 30 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत विहीत ध्वनीमर्यादा राखुन ध्वनीक्षेपकांचा वापर करण्याबाबत खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून याद्वारे सुट जाहीर करण्यात येत आहे (ही सुट शांतता क्षेत्रात लागु राहणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी).

        महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर शोभायात्रा ही विहीत वेळेत दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत संपेल याची दक्षता आयोजकांनी घेण्यात यावी. शोभायात्रेबाबत पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच पोलीस विभागाकडून निर्गमीत करण्यात आलेल्या सर्व नियमांचे/अटी व शर्तीचे पालन करणे आयोजकास बंधनकारक राहील. शोभायात्रे दरम्यान ध्वनीक्षेपक वापरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळा जवळून शोभायात्रा जात असतांना ध्वनीक्षेपणकाच्या आवाजामुळे जनतेस त्रास होणार नाही व आवाजाचे प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

        शोभायात्रेकरीता आयोजकांनी योग्य संख्येत स्वयंसेवक नियुक्त करुन त्यांना पासेस वितरण करुन नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांच्या नावाची यादी संबंधित पोलीस स्टेशन येथे शोभायात्रेच्या एक दिवस पूर्वी देण्याची जबाबदारी आयोजकाची राहील. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शोभायात्रेच्या दरम्यान पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे आयोजकांनी पालन करणे बंधनकारक राहील. शोभायात्रा दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी प्रकाश व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकाची राहील. शोभायात्रामध्ये वेडे इसम/दारुडे येऊन काही अनुचित प्रकार करणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. ध्वनीक्षेपकावर समयोचित वाद्याशिवाय उत्तेजक अश्लील, द्विअर्थी गाणे, जातीवादी पुढाऱ्यांचे प्रक्षोभक भाषण वाजवणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. शोभायात्रेस लाठ्या, काठ्या व इतर अस्त्र-शस्त्र बाळगता येणार नाही.

       आवश्यक वाटल्यास व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदर परवानगी कोणतीही पुर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल याची आयोजकांनी नोंद घेण्यात यावी. कार्यक्रमा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास आयोजकास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची आयोजकांनी नोंद घेण्यात यावी. आयोजकांनी ध्वनी प्रदुषण नियम 2000 मधील नियम 3, 4 व 5 चे तंतोतंत पालन करावे. असे जिल्हादंडाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts