गोंदिया- (ता.2) गावातील कोणत्याही इसमाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना रोख एक हजार पाचशे तर गावातील कोणत्याही कुटुंबात प्रथम कन्यारत्न जन्मास आल्यास त्यास अकराशे रुपये रोख देण्याचा स्तुत्य उपक्रम तालुक्यातील टेमनी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेल्या या लोकोपयोगी निर्णयासाठी सर्वत्र ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
मृत्यू हा कुणाला सांगून येत नाही. त्यातच गावातील सर्वच कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सारखीच नसते. त्यामुळे अचानकपणे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास त्या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण येत असते. हीच अडचण ओळखून गावातील कोणत्याहि इसमाचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना तात्काळ रोख एक हजार पाचशे रुपये मदत म्हणून देण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे गावातील अनेक आर्थिक कमजोर असलेल्या कुटुंबियांना अडचणीच्या वेळी दुःख सावरण्यासाठी बळ मिळणार आहे. त्यातच आता गावातील कोणत्याही कुटुंबात प्रथम कन्यारत्न जन्मास आल्यास त्या जोडप्यास रोख अकराशे रुपये माहेर भेट म्हणून देण्याचा निर्णयही ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. सदर दोन्ही निर्णय नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेत सर्वानुमते पारित करण्यात आले. यावेळी प्रभारी सरपंच शिवलाल नेवारे, ग्रामपंचायत सदस्य विनोद मेश्राम, शेखर किरणापुरे, छणेश पटले, सुनिता पटले, दुर्गाबाई नांदने, विमलाबाई उईके, वर्षाबाई मलगाम, सुशीला डाहाट, ग्रामसेवक ललित सोनवाणे, संगणक परिचालक ओमकार पारधी, परिचर गोबरीसिंह बरेले, रणजितसिंह पंडेले प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या या लोकोपयोगी निर्णयासाठी समस्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले आहे.