राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रभावी प्रयत्नांमुळे या उपकेंद्रास अखेर मंजुरी
गोंदिया: जिल्ह्यातील देवरी व चीचगड परिसरातील नागरिक, शेतकरी व उद्योजकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर आता ठोस आणि कायमस्वरूपी उपाय निघणार आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देवरी येथे प्रस्तावित १३२ के.व्ही. (EHV) वीज उपकेंद्राच्या उभारणीस मंजुरी मिळाली असून, या महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे.
देवरी तालुक्यातील देवरी, चीचगड तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये दीर्घकाळापासून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी सिंचन व्यवस्था, घरगुती वापर तसेच लघु व मध्यम उद्योगांवर गंभीर परिणाम होत होता. विशेषतः शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
![]()
या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सभागृहात ठामपणे मांडला होता. यावेळी या विभागाचे माननीय मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देवरी येथील १३२ के.व्ही. उपकेंद्राच्या उभारणीबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आश्वासनानंतर आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदर उपकेंद्राच्या मंजुरीस गती मिळाली असून, प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
१३२ के.व्ही. उपकेंद्र उभारल्यास देवरी–चीचगड परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर व दर्जेदार होणार असून, पाणीपुरवठा योजना, शेती, उद्योगधंदे तसेच घरगुती वापरासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
