गोंदिया: मुरदोली-मुंडीपार रस्त्यावर काही दिवसांपूर्वी दोन दुचाकींची भीषण धडक होऊन अपघात घडला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. अपघाताच्या काही वेळानंतर त्या मार्गावरून प्रवास करत असलेले आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी प्रसंगावधान राखून आपली गाडी थांबवली व जखमींच्या मदतीसाठी पुढे आले.
अपघाताची गंभीरता ओळखून आमदार बडोले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्काळ निर्णयाने व त्वरित कारवाईमुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर आमदार बडोले यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत याची काळजी घेतली. त्यांनी जखमींना धीर दिला व आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आमदार बडोले यांच्या माणुसकीच्या जाणीवेचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक केले आहे. संकटाच्या प्रसंगी तत्काळ मदत करणारे नेतृत्व ही समाजासाठी आश्वासक बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.