महासंस्कृती महोत्सवातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ-आमदार विनोद अग्रवाल

494 Views

महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन

          गोंदिया, दि.13 : महाराष्ट्राला प्राचिन लोककलेचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

        सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय “महासंस्कृती महोत्सव” चे उद्घाटन श्री. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनथम एम., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील, उपविभागीय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड, टाईम्स ग्रुपचे साई डोमा यावेळी मंचावर उपस्थित होते.

         आमदार श्री. अग्रवाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमीत्त तसेच त्यांचे विचार जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून सांस्कृतिक विभागाला एक नवीन ओळख मिळाली असून लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याकरीता अशाप्रकारचे कार्यक्रमाचे महत्व आहे. ज्या काळात प्रचार-प्रसाराची साधणे नव्हती तेव्हा लोककलेच्या विविध माध्यमातून संदेश गावागावांपर्यंत पोहोचले जायचे. त्या कलेचा वापर संस्कृतीच्या माध्यमातून ओळख पटवून देण्याकरीता चांगले कार्य आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, कोणत्या देशाची संस्कृती कशी आहे त्याची ओळख त्या देशाच्या संस्कृतीवर अवलंबून असते. या माध्यमातून लोककलेचे प्रभावी माध्यम जनतेपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. लोककलेची जपवणूक महाराष्ट्र शासन करीत आहे. व्यक्तीच्या प्रभावी जडणघडणीत त्या देशाच्या संस्कृतीचा वारसा लाभलेला असतो असे त्यांनी सांगितले.

          जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन गोंदिया द्वारे जिल्ह्यातील कलावंतांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी दिनांक 12 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असा आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर गोंदिया जिल्हा वसलेला आहे. आपल्या जिल्ह्याला प्राचिन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. संस्कृती म्हणजे चांगली कृती. पारंपारिक लोककला जपणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील दंडार, खडीगंमत, भारुड, किर्तन, पोवाडा, तमाशा, आदिवासी नृत्य प्रसिध्द आहे.

16 फेब्रुवारी 2024 पर्यंत दररोज सायंकाळी 6 वाजता पासून रात्री 10 पर्यंत रसिकांसाठी हा कार्यक्रम नि:शुल्क आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची महासंस्कृती महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

        कार्यक्रम परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. जवळपास 30 च्या वर स्टॉल्स असून खाद्यपदार्थांसह साहित्याचे स्टॉल्स उपलब्ध आहेत, त्याचा जिल्ह्यातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेले आहे.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवी देशपांडे व राजन चौबे यांनी केले. कार्यक्रमास तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उध्दव नाईक यांचेसह जिल्ह्यातील रसिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले. यानंतर महाराष्ट्रातील प्रसिध्द गायक नंदेश उमप यांनी ‘जागर लोककलेचा’ या सदरात शिवाजी महाराजांचा पोवाडा, श्रीहरी विठ्ठलं, गणेश वंदना, राम आयेंगे, गोंधळ, भारुड, लावणी, वासुदेव आदि प्रकारातील बहारदार गाणी म्हणून रसिक बांधवांना मंत्रमुग्ध केले.

बुधवारचे कार्यक्रम :- बुधवार १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक लोककला नृत्यमध्ये रेला नृत्य सादर करण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायक राहूल देशपांडे यांचा मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम मुख्य आकर्षण असणार आहे. त्यासोबतच सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजे दरम्यान भजन स्पर्धा होणार आहे. राहूल देशपांडे कलेक्टिव्ह हा कार्यक्रम मुख्य आकर्षण आहे. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहा ते दहा आहे.

Related posts