गोंदिया: शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

330 Views

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

          गोंदिया,दि.21 : मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मानवाने जीवनात सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.

         21 जून आंतराराष्ट्रीय योग दिनानिमीत्त इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

         योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी योगा केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन संतुलीत राहते. योगासनामुळे शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. योगासनामुळे मनुष्य निरोगी राहतो व शरीर बळकत बनते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योगा निरंतर करीत राहावे असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आजची आपली जीवनशैली पुर्णपणे बदललेली आहे. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगसाधनेचा समावेश करणे आवश्यक आहे. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते. नियमीत योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मनशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी योग प्रशिक्षक विकास देशपांडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शवासन, वज्रासन, शशांकासन, उत्तान मंडुकासन, मक्रासन, भूजंगासन, सेतू बंधासन, उत्तान पादासन, पदमासन, सुखासन, ध्यान मुद्रासन, ताडासन, वृक्षासन, कपालभाती, नाडी शोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, अर्ध उष्ट्रासन, वक्रासन, शलभासन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, शीतली प्राणायाम उपस्थितांकडून करवून घेतले व योगासनाचे महत्व पटवून दिले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, पतंजली योग समिती, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, योग मित्र मंडळ, पालावरची शाळा, पोलीस विभाग, नगर परिषद गोंदिया यांचे सहकार्य लाभले.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.नागेश गौतम यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.प्रशांत कटरे यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts