अतुल सतदेवे यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०२३ पुरस्कार जाहिर, १५ जून ला नागपुरात होणार सत्कार

329 Views

 

गोंदिया:- संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यांना व त्यांच्या संघटनेला वर्ष 2023 चा डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान पुरस्कार ज़ाहिर करण्यात आला आहे. जनामनात संविधान संस्कृति रुजवून समाजात एकता बंधुत्व राखण्यासाठी अथक प्रयत्न करणारे तसेच महिला विद्यार्थी युवकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता कला कौशल्य लेखन सांस्कृतिक बौद्धिक प्रतिभा प्रोत्साहन, प्रशिक्षण शिबीर उपक्रम, व्यसनमुक्ति जनजागृती अभियान चालविणारे, अन्याय अत्याचार प्रसंगी आंदोलन उभे करुन जनसामान्यांची आवाज़ बुलंद करणारे म्हणून अतुल सतदेवे यांची ओळख आहे. त्यांच्या समाज हितार्थ सुरु असलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा व त्यांच्या संघटनेचा सत्कार करण्यात येत आहे .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह (बानाईचे सभागृह), उरुवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे गुरुवार दि. १५ जून २०२३ रोजी दुपारी ३.०० वा. सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून गडचिरोलीचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील (भापोसे) यांच्या हस्ते सत्कारमूर्तीं अतुल सतदेवे व संविधान मैत्री संघ यांना सन्मानित- गौरवांकित करण्यात येईल. माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरचे अध्यक्ष दादाकांत धनविजय हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना २००५ मध्ये सुरू केलेला संविधान प्रास्ताविकेचे शाळांमधून वाचन व २६ नोव्हेंबर-संविधान दिन या देशातील पहिल्या ‘संविधान ओळख’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संविधानाच्या जाणीव जागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था-संघटना व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मानाने गौरवांकित करून त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधान फाऊंडेशनने हा सामाजिक उपक्रम कार्यान्वित केला असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

Related posts