कल्याणकारी योजनांच्या माहितीसह लोकांपर्यंत पोहचा : खा.सुनिल मेंढे
अर्जुनी मोरगाँव। देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने 60 वर्ष सत्ता उपभोगली. त्या तुलनेत 9 वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सर्वच आघाड्यांवर प्रभावी ठरल्याचे स्पष्ट होते. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विचारधारेवर काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक स्तरावर देशाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. आज भारताकडे जगातील अनेक देश विविध कारणांसाठी आशेने पाहू लागले आहेत, हीच खरी मोदींच्या नेतृत्वाची किमया आहे, असे मत मध्य प्रदेशचे सहकार मंत्री डॉ. अरविंद भदौरिया यांनी व्यक्त केले. तर केंद्राच्या कल्याणकारी योजना घेऊन महाजन संपर्क अभियान लोकांच्या घरापर्यंत पोहोचा असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी कार्यकर्त्यांना केले.
केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या महा जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आज मध्य प्रदेशाचे सहकार मंत्री डॉ. अरविंद भदौरिया भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी मोरगाव अर्जुनी येथे आयोजित बैठकीत संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर गुजरातचे राज्यसभा सदस्य रामभाई मोखारिया, खासदार सुनिल मेंढे, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, माजी आ. राजकुमार बडोले, विजय शिवणकर, बाळा अंजनकर, बाळा काशिवार, माजी खा. शिशुपाल पटले, माजी आ. संजय पुराम, जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, प्रदीप पडोळे,रचना ताई गहाने- महिला मोर्चा प्रदेश महामंत्री, रेखाताई भाजीपाले, संजय कुळकर्णी, मदन कटरे, महेंद्र निंबार्ते, लायकराम भंडारकर, सुभाष आकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, अनेक कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम मोदींनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले. या देशाला भक्कम नेतृत्व देण्याचं काम मोदींनी केल. 370 कलम रद्द करण्याच्या विषयावरून काँग्रेसने अनेक आरोप केले. देशात अराजकता माजेल असा भ्रम पसरविला गेला. मात्र विरोधकांचे मोदी सरकारला बदनाम करण्याचे सर्व षडयंत्र असमर्थ ठरल्याचे ते म्हणाले.
यावेळी खा. सुनील मेंढे यांनी मार्गदर्शन केले. साठ वर्षाच्या काळात जे काँग्रेसने केले नाही त्याच्या कितीतरी पट कल्याणकारी कार्य नऊ वर्षात मोदी सरकारने केले. गरीब कल्याणासोबत जागतिक स्तरावर देशाचा बहुमान वाढवण्याचे काम करण्यात आले. हेच काम आणि या योजना घेऊन 30 मे ते 30 जून या कालावधीत महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेपुढे घेऊन जाव्यात असे आवाहन त्यांनी केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम म्हणाले की, राष्ट्र निर्माणात पंतप्रधान मोदी यांचा मोठा हातभार आहे. मोदींची तुलना कुणासोबत होऊ शकत नाही, वैश्विक स्तरावर जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन चैतन्य उमाळकर तर आभार प्रदर्शन शिवराम गिर्हेपुंजे यांनी केले.