गोंदिया: मनरेगा अंतर्गत 1 लाख 78 हजार कुटूंबांना रोजगार, 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्दिष्ट

199 Views

 

      गोंदिया, दि.31 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत रुपये 26659.68 लक्ष निधी खर्च झालेले असून त्यामधून 62.45 लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात 1,78,665 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे.

          सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉपेड खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी शोष खड्डे इत्यादी कामांचे नियोजन करुन आर्थिक वर्षात लेबर बजेटच्या लक्षांक 63.52 लक्ष मनुष्य दिवस नुसार 62.45 लक्ष मनुष्य दिवस उद्दिष्ट साध्य केले आहे.

         एकंदरीत जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे उदा. मातीबांध, पांदन रस्ते, सिंचन विहिरी, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, भातखाचर, शौचालय, नाला सरळीकरण, तलावातील गाळ काढणे/तलावाचे खोलीकरण, शेततळे, वनतळी, मैदान सपाटीकरण करणे इत्यादी कामे होत आहेत. सन 2022-23 या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यात 3,386 कामे पुर्ण करण्यात आले आहे.

       सन 2023-24 या आर्थिक वर्षात देखील जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कामाचा नियोजन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामे सुरु करुन जास्तीत जास्त कुटूंबांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या जिल्ह्यात सेल्फवर 9,746 कामे असून यावर्षी सुध्दा लेबर बजेटचे उद्दिष्टप्रमाणे मार्च-2024 अखेर पर्यंत 100 टक्के उद्दिष्ट साध्य होईल. असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) लिना फलके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts