गोंदिया, दि.2 : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 आणि 2008 व सुधारित नियम 2012, सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय कन्व्हर्जन समिती स्थापन करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील एकूण 69 गावांना सामुहिक वनहक्क कायद्यानुसार पट्टे प्राप्त झाले असून सदर गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकारी तथा तालुका कन्व्हर्जन्स समितीचे अध्यक्ष विकास राचेलवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
![]()
आदिवासी विकास विभागाचे दिनांक 12 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे वननिवासी व इतर पारंपारिक वननिवासी यांच्या फायदयासाठी सामुहिक वनसंपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन करणे तसेच वनावर उपजिविका अवलंबून असलेल्या ग्रामीण समाजाला निरंतर व शाश्वत उपजिविका साधन उपलब्ध करुन देणे व वनाचे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, संरक्षण व पुनर्निर्माणाकरीता व कार्यक्षम व्यवस्थापन पध्दत अवलंबविणे आवश्यक असल्याचे श्री. राचेलवार यांनी सांगितले.
सभेला देवरी व चिचगडचे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी व तालुकास्तरीय कन्व्हर्जन्स समितीचे अशासकीय सदस्य व 69 सामुहिक वनहक्क प्राप्त गावातील ग्रामसभांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी हरिश्चंद्र सरियाम यांनी मानले.
