मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने भाषा संवर्धनाचा संकल्प करुया…रुपेशकुमार राऊत

388 Views

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा

गोंदिया दि. २7 :  मराठी ही समृद्ध भाषा असून मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल प्रमाणात आहे. दैनंदिन व्यवहारात आपण आपल्या मातृभाषेचा वापर तर करावाच त्याचबरोबर मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात वाचावे. भाषा व साहित्य माणसाला ज्ञानी व प्रगल्भ करत असते. मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचा आजचा दिवस असून आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने भाषा संवर्धनाचा संकल्प करुया असे प्रतिपादन जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय ग्रंथालय येथे आज कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला त्यावेळी  ते बोलत होते.

         जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे, माहिती सहायक के. के. गजभिये व जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे अंकुश कटरे यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

        मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आपल्या शैलीदार लेखनीतून ज्यांनी मराठी भाषेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले ते ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ विजेते वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी जास्तीत जास्त निर्दोष बोलणे, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणे. सतत वाचन करणे आवश्यक आहे. असे जर प्रत्येक मराठी व्यक्तीने प्रयत्न केले तर मराठी भाषेचे निश्चितच संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल असे श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले.

       “येथल्या दरीदरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी, येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी” या कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी मराठी भाषेचा यथार्थ गौरव करणाऱ्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी जैसी दीपांमाझि दिवटी। कां तिथींमाझि पूर्णिमा गोमटी। तैसी भाषांमध्ये मर्‍हाटी । सर्वोत्तम।। जैसी सरितांमध्ये गोदावरी। कां पर्वतांमधे रत्नगिरी। तैसी भाषांमध्ये साजरी। मर्‍हाटी पै।। अशा शब्दांत मराठी भाषेचा महिमा सांगितला आहे. त्यांनी मराठी भाषेला कस्तुरीची उपमा दिली, असे त्यांनी यावेळी सांगितले. आजच्या मराठी भाषा गौरव दिनी आठवड्याला एक मराठी पुस्तक वाचण्याचा संकल्प करुया असे आवाहन त्यांनी केले.

         मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी गौरव भाषा दिन साजरा केला जातो.

         मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी १५ वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अस्मिता मंडपे यांनी केले.

Related posts