समृध्द जीवन जगण्यासाठी वाचन आवश्यक- डॉ.गजानन कोटेवार

268 Views

गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे

थाटात उद्घाटन

       गोंदिया, दि.22 : वाचनालयात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी वाचकांची संख्या वाढली आहे. वाचनाने मनुष्याचे विचार परिपक्व व प्रगल्भ होतात. विविध प्रकारच्या साहित्य वाचनातून जीवनाला दिशा मिळते व ज्ञानात भर पडते. वाचनातून मिळणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांची नोंद करणे म्हणजे आपण स्वत: अनुभव समृध्द करणे होय. म्हणजेच समृध्द जीवन जगण्यासाठी विविध साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार यांनी केले. गोंदिया ग्रंथोत्सव-2022 च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, सचिव डी.डी.रहांगडाले, श्री गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नमिता बघेले, हायस्कूल विभागाच्या प्राचार्य सारिका देशपांडे, हिन्दी हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती श्रीवास्तव, श्रीमती शेख मंचावर उपस्थित होत्या.

ग्रंथालयांनी शाळा दत्तक घेतली पाहिजे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल. ग्रंथाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथालय चळवळीला रुजविले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याची वाटचाल करण्यासाठी वाचनालयाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी गोंदियातील शारदा वाचनालयाच्या अभ्यासिकेची प्रेरणा घेतली पाहिजे. या वाचनालयातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अ व ब वर्गाचे वाचनालय 7 ते 8 तास काम करतात, त्यामुळे शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील वाचनालयाकडे आर्थिकदृष्ट्या लक्ष देऊन आठ पट अनुदान वाढविले पाहिजे. ग्रंथालय चळवळीचे प्रश्न शासनाने मार्गी लावले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रंथ व वाचक यांचे नाते अधिक घट्ट करण्याचे काम ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांनी निव्वळ शिक्षण घेऊन उपयोग नाही तर पुढे आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरीता अथक परिश्रम करणे गरजेचे आहे. ग्रंथालय चळवळीच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रदीप दाते यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी यादृष्टीने दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वाचन संस्कृती जोपासावी व वाचन चळवळ प्रगल्भ करावी हा या मागचा उद्देश आहे. ग्रंथालय हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचन संस्कृती गतीशील व्हावी यासाठी महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वाचली पाहिजे. वाचन संस्कृती वाढविण्याकरीता व जोपासण्याकरीता सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे प्रास्ताविकातून अस्मिता मंडपे यांनी सांगितले.

गोंदिया ग्रंथोत्सवाची सुरुवात २२ फेब्रुवारी रोजी सकाळी  ग्रंथदिंडीने करण्यात आली.

प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्या आली.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसीय गोंदिया ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन श्री गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रसेन गेट जवळ, गोंदिया येथे करण्यात आले आहे. या दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवात नामांकीत प्रकाशकांनी आपले स्टॉल लावले असून नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार विनायक अंजनकर यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts