दोन दिवसीय गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन २२ फेब्रुवारीला

397 Views

  • दोन दिवस साहित्य मेजवानी
    पुस्तक प्रेमींसाठी पुस्तकांचे स्टॉल

         गोंदिया,दि.21 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी गोंदिया यांच्या वतीने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ ला श्री. गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रसेन गेट जवळ, गोंदिया येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाची सुरुवात बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ११ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला साहित्य प्रेमी, नागरिक व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

           बुधवार २२ फेब्रुवारी रोजी उद्घाटनानंतर दुपारी १.३० ते ३.०० या दरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर परिसंवाद होणार आहे. उपसंचालक सांख्यिकी रुपेशकुमार राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास श्रीराम पाचखेडे, प्रा. किशोर पटले व विदर्भ स्टडी सर्कलचे त्रिलोक शेंडे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. दुपारी ०३ ते ०५ या वेळेत वाचन आणि समाज माध्यमे या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या चर्चेत प्रा. डॉ. रा.म. गहाणे, प्रा. कविता राजाभोज, नमाद महाविद्यालयाचे ग्रंथपाल सुनील जाधव व डॉ. प्रभाकर लोंढे सहभागी होणार आहेत.

         गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ०१ वाजेदरम्यान शांताबाई शेळके, अण्णाभाऊ साठे, वसंत बापट, जी. ए. कुळकर्णी, कवी शंकर रमाणी यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्ष अ. भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत लखनसिंह कटरे, प्रा. डॉ. सी.एस. राणे, कवी माणिक गेडाम व मुख्याध्यापक के.एस. वैद्य या परिसंवादात भाग घेतील. सामाजिक प्रबोधन एक अवलोकन या विषयावरील परिसंवाद दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. प्रा. डॉ. सविता बेदरकर, प्रा. डॉ. वर्षा गंगणे, शाखा अभियंता गोवर्धन बिसेन व प्रा. प्रकाश मेहर हे आपले विचार मांडणार आहेत.

           जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सवाचा समारोप २३ फेब्रुवारी दुपारी ३.३० ते ०५ या वेळेत होणार आहे. उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रशेखर आंबोळे व डी.डी. रहांगडाले समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य रवी गिते, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी केले आहे.

Related posts