गोंदिया: अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा- पालक सचिव श्याम तागडे

412 Views

          गोंदिया,दि.7 : आपत्ती ही कधीच वेळ काळ सांगून किंवा पुर्व सूचना देऊन येत नसते ती अचानक येते. आपत्ती केवळ पूर किंवा अतिवृष्टी एवढीच मर्यादित स्वरुपाची नसते. भूकंप, आग, रस्ता अपघात, ईमारत कोसळणे, दरड कोसळणे, वन्य प्राण्यांचा हल्ला, तलावाची पाळ फुटणे व वीज कोसळणे अशा अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा अशा सूचना प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तथा पालक सचिव गोंदिया जिल्हा श्याम तागडे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

          मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाऊस व आपत्ती व्यवस्थापन या विषयाचा आढावा घेण्यात आला.  यावेळी त्यांनी अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या.

         अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी एकंदरीत परिस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा व बाघ या प्रमुख नद्या आहेत. सिवणी येथून संजय सरोवर जलाशयाच्या माध्यमातून वैनगंगा व बाघ नदीचा संगम गोंदिया येथील बिरसोला घाट येथे होतो. वैनगंगा ही नदी गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यातून वाहते. जिल्ह्यातील पूर प्रवण ९६ गावांपैकी वैनगंगा नदी काठावरील तिरोडा व गोंदिया तालुक्यातील ३२ गावांना पुराचा धोका आहे, असे त्यांनी सांगितले.

         ४ जुलै रोजी गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या तालुक्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी दरम्यान वीज कोसळून सहा व्यक्तींचा मृत्यु झाला. २० जनावरांचा देखील यात मृत्यू झाला. २१२ घर अंशतः तर ७ पूर्णतः पडली. ५१ गोठ्यांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे असे यावेळी सांगितले. मदत तातडीने देण्याच्या सूचना  पालक सचिवांनी केल्या. यापूर्वी पालक सचिवांनी आपत्ती साहित्याची पाहणी केली. बाघ इटियाडोह धरणातील पाणी साठ्यांविषयी अभियंता आर.जी. कुऱ्हेकर यांनी सादरीकरण केले.

          पूर परिस्थितीत अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे असे सांगून पालक सचिव म्हणाले की, नुकसानीचे पंचनामे करतांना खरोखरच नुकसान झालेल्या व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात यावी. वेळोवेळी याचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा. या बैठकीत धान खरेदी बाबतही आढावा घेण्यात आला. बैठकीचे संचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

Related posts