गोंदिया: चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजली विद्यामंदिरे, जिल्हाभरात प्रवेशोत्सव साजरा

234 Views

 

प्रतिनिधि।
गोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून शांत निवांत असलेला शालेय परिसर आज चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजला. शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे प्रमुख, शिक्षक व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर चिमुकल्यांचे स्वागत केले. शाळा प्रवेशाचा हा सोहळा जेव्हढा आनंददायी होता तेव्हढाच हळवा होता. या निमित्ताने अनेकांना आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीत रमण्याचा मोह आवरता आला नाही.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांचे जिल्हाभरात आनंददायी पध्दतीने स्वागत करण्यात आले. १०० टक्के पटनोंदणी होण्याच्या दृष्टीकोनातून शाळेच्या पहिल्या दिवशी २९ जून २०२२ ला महसूल विभागातील सर्व अधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा प्रारंभ दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक करुन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने गती प्रदान करण्यात प्रशासनाने पुढाकार घेतला.

नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या स्वागतासाठी जिल्हयातील सुसज्य शाळांमध्ये मंगलमय उत्साहाच्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या शाळांमध्ये जास्तीत जास्त बालके प्रवेश घेतील याकरिता सर्वांनी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांचे कौतुक व शिक्षकांना मार्गदर्शन करुन नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी खर्रा प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतांना ते विद्यार्थ्यांमध्ये रममाण झाले. आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेतही प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बोरगाव येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या सरांडी येथील शाळेत सहायक आयुक्त डॉ. मंगेश वानखेडे यांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. अनेक अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व प्रोत्साहन दिले.

Related posts