गोंदिया: नगरपरिषद व नगरपंचायत आरक्षण सोडत 13 जूनला

520 Views

गोंदिया, दि. 11: जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला असून गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व आमगाव नगरपरिषद तसेच गोरेगाव नगरपंचायत येथील सदस्य पदांची आरक्षण सोडत सोमवार 13 जून रोजी काढण्यात येणार आहे.

 निवडणूक आयोगाने जाहीर केल्या प्रमाणे 11 जून 2022 रोजी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. 13 जून 2022 सोमवारी नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महिला या पदांचा समावेश आहे. 15 जून रोजी आरक्षणाची अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 15 जून ते 21 जून 2022 हा असणार आहे. आरक्षण सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे 24 जून 2022 पर्यंत पाठविण्यात येईल. 29 जून 2022 पर्यंत विभागीय आयुक्त नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणास मान्यता देतील. 1 जुलै 2022 पर्यंत सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related posts