गोंदिया: बिरसी एयरपोर्टला कुंवर तिलकसिंह नागपुरे नाव द्या

877 Views

 

लोधी कुंवर तिलकसिंह नागपुरे विमानतळ संघर्ष समितीची पत्र परिषदेतून मागणी

गोंदिया : ब्रिटीश काळात दुसर्‍या विश्वयुध्दाच्या कालखंडात सन १९४२ मध्ये विमानतळ निर्माणासाठी जमिदार कुंवर तिलकसिंह नागपुरे यांनी आपल्या मालकीची ४८० एकर जमिन दान दिली होती. ते विदर्भातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती होते. त्यांनी भंडारा-गोंदिया जिल्हृयात अनेक लोकहित कार्यासाठी जमिन व धन उपलब्ध करून दिले. अशा दानशूर व्यक्तीने व त्यांच्या वारसदारांनी कधीच कुठल्याही गोष्टीची मागणी शासनाकडे केली नाही. मात्र त्यांचा कार्याची ख्याती व सन्मान नेहमी कायम रहावा, यासाठी शासनाने बिरसी विमानतळाचे नाव ‘कुंवर तिलकसिंह नागपुरे विमानतळ’ असे करावे अशी मागणी लोधी क्षत्रिय समाज गोंदिया-भंडारा व लोधी कुंवर तिलकसिंह नागपुरे विमानतळ संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शासकीय विश्रामगृहात ११ एप्रिल रोजी आयोजित पत्र परिषदेत पुढे बोलताना समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, दानशुर कुंवर तिलकसिंह नागपुरे यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्यामध्ये सन १९४२ मध्ये शहरातील मध्य भागात लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून रूग्णालयासाठी १० एकर जागा व १ लाख रूपये दिले होते. ग्राम कारंजा येथे शेतकर्‍यांच्या कृषी विकासासाठी ६५ एकर जागा दान दिली. तिथे आज पोलिस मुख्यालय आहे. पिंडकेपार गौशाळासाठी ३४ एकर जागा दान केली. शिख समाजासाठी रेलटोली येथील गुरूव्दारासाठी जमिन दान दिली. फुलचूर येथे श्रीरामाच्या मंदिरासाठी १४ एकर जमीन दानात दिली. उच्च शिक्षणासाठी कामठा येथे कॉलेज निर्माणासाठी १५ एकर जागा व १५ हजार रूपये दिले. भंडारा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी स्वातंत्र्यपूर्वी जलापूर्ती योजना सुरू करून विशाल पाणीटाकी निर्माण केली. भंडारा लायब्ररीमध्ये इंद्रराज सभागृहाचे निर्माण केले. गोंदिया जिल्ह्यातील गरीब व अशिक्षीत लोकांसाठी कामठा, अर्जुनी, फुलचूर, हिरडामाली, सोनबिहरी, कारंजा आदि अनेक गावात शाळांसाठी शेकडो एकर भुमि दानात दिली. असे अनेक जनकल्याणकारी व परोपकाराचे कार्य त्यांच्या माध्यमातून झाले आहे. तसेच त्यांच्या निधानानंतरही त्यांनी दिलेले वचन त्यांच्या वंशजांनी पूर्ण केले आहेत. अशा निस्वार्थ समाजसेवी व्यक्तीचे नाव विमानतळाला दिल्यास त्यांना खरी आदरांजली होणार आहे. या संदर्भात लोधी समाज व संघर्ष समितीव्दारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, नागरी उड्डयण मंत्री, पालकमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. तर खा.सुनिल मेंढे व आ.विनोद अग्रवाल यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असून यासाठी सकारात्मक आहेत. इतर समाजालाही आम्ही या संघर्ष समितीमध्ये सहभागी करणार आहोत. या मागणीला शासनाने अविलंब पूर्ण करुन विमानतळाला कुंवर तिलकसिंह नागपुरे यांचे नाव द्यावे. लवकरच या संदर्भात दिल्ली येथे नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेणार असल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
यावेळी पत्र परिषदेत चैताली नागपुरे, अ‍ॅड.हेमलता पतेह, सुनिल लिल्हारे, नंदकिशोर बिरनवार, निरजसिंह नागपुरे, राजीव ठकरेले, पृथ्वीराजसिंह नागपुरे, शिव नागपुरे,चैतरामसिंह नागपुरे, उमाशंकर उपवंशी, सुरेश लिल्हारे, सचिन बंडे, आशीष नागपुरे, संजू नागपुरे, अरविंद उपवंशी, अर्जुन नागपूरे, राधेश्याम नागपुरे, कुंवरसिंह बघेले, प्रशांत लिल्हारे, पांडूरंग मुटकुरे, विजय दमाहे, टेकचंद नागपुरे, डिगेश नागपुरे, चैनलाल धामडे, प्रशांत लिल्हारे, आशिष नागपुरे, देवेंद्र नागपुरे, पंकज लिल्हारे, सुरेश लिल्हारे, कमलेश चिखलोंडे, डॉ.संजय माहुले, अमित नागपुरे, मुकेश नागपुरे, हेमराज सुलाखे, सुर्यकांत नागपुरे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणेकडून उपेक्षा
व्यवसायिक उड्डाण शुभारंभ प्रसंगी १३ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात प्रशासकीय यंत्रणेला कुंवर तिलकसिंह नागपुरे यांचा विसर पडला होता. त्यांच्या वंशजाची उपेक्षा करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी विमानतळासाठी ४८० एकर जमिन दिली. कमीत कमी त्यांच्या नावाचा सन्मान राखला जावा, एवढी मात्र अपेक्षा आहे. त्यामुळे विमानतळाचे नामाकरण ‘कुंवर तिलकसिंह नागपुरे विमानतळ’ असे करावे, अशी मागणी आहे.

Related posts