जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्‍वासनानंतर मोरवाही वाशीयांचे आंदोलन मागे, दोषीवर होणार कारवाई

247 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया( ता.2) तालुक्यातील मोरवाही येथील बुद्ध विहार बांधकाम प्रकरणी मागच्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींवर कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतरच सोमवारी ( ता.1) रात्री उशिरा आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा समितीतर्फे करण्यात आली. समितीने आंदोलन मागे घेतल्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे.
मोरवाही येथील विनापरवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्यांना तसेच मागच्या दोन वर्षापासून बुद्ध विहाराचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ,उप अभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागच्या ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाज बांधवाना तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलन दरम्यान दोषींवर दोन दिवसात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊनही जिल्हा प्रशासनाने दोन महिने उलटूनही दोषी व्यक्तींची कोणतीही चौकशी केली नाही. अखेर येथील बौद्ध समाज बांधव तसेच आमगाव येथील बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार(ता. 28) पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला बळ म्हणून येथील महिलांनी सोमवारी (ता.1) आत्मदहनाचा इशारा दिला होता. हे विशेष.

महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी महिलांच्या हातून ज्वलनशील पदार्थ हिसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत आंदोलनकर्त्याना चर्चेसाठी आमंत्रित केले. यावेळी प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, पोलीस निरीक्षक बोरसे, तर आंदोलकांनी तर्फे भारतीय बौद्ध महासभा आमगाव चे अध्यक्ष भरत वाघमारे, सचिव योगेश रामटेके, समता बुद्ध विहार समितीचे दिलीप मेश्राम, विजय मेश्राम,आशिष मेश्राम, अनिल रामटेके, चंद्रशेखर मेश्राम, राजकपूर मेश्राम, पूर्व सरपंच सुरेश कावळे, पोलिस पाटील विनोद ठाकूर सहभागी झाले होते.

यात आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करीत या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर आठ दिवसात कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतरच रात्री उशिरा मागच्या चार दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डी.एस. मेश्राम, संदीप मेश्राम, श्रेयस गोंडाने, मंगल गोंडाने, आनंद बन्सोड, उमाकांत भालेकर, पंचशीला मेश्राम, संगीता रामटेके, प्रमिला मेश्राम, शालिनी मेश्राम, सूर्यकांता वैद्य,सविता मेश्राम,सुनिता वैद्य, माधुरी मेश्राम, पंचशीला भालाधरे, पोर्णीमा मेश्राम, ताराबाई भीमटे,प्रतिमा सोनटक्के, कल्पना मेश्राम, पद्मा टेंभुर्णीकर, शालिनी आनंद मेश्राम त्यांनी सहकार्य केले.ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेले आंदोलनसमितीने मागे घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे.मात्र आता दोषी व्यक्तीवर जिल्हा प्रशासन किती दिवसात कारवाई करतो की पुन्हा त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतो याकडे जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.

Related posts