दिवाळीपूर्वी सुरु होणार धान खरेदी केंद्र, ३० ऑक्टोबरपासून खरेदीला होणार सुरुवात : यंदा मिळणार १९४० रुपये प्रतिक्विंटल दर- खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल

3,617 Views

 

गोंदिया : खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची विक्री करून शेतकरी उधार-उसणवारी फेडून दिवाळ सण साजरा करतात. हलके धान आता बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरु व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर आता शासनाने सुध्दा त्याला हिरवी झेंडी दिली आहे.

यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ अशा एकूण १४९ धान खरेदी केंद्रांवरून ३० ऑक्टोबरपासून धान खरेदीला सुरुवात होणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी यावर्षीपासून शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांकडून शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी केली जाणार आहे. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता ३० ऑक्टोबरपासून या दोन्ही विभागाचे धान खरेदी केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
…………….
सेवा सहकारी संस्थांना प्रशिक्षण
शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदीदरम्यान कुठलाही गोंधळ निर्माण हाेऊ नये व याचा शेतकऱ्यांना फटका बसू नये, यासाठी सर्व १४९ शासकीय धान खरेदी केंद्राच्या सेवा सहकारी संंस्था आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे खरेदी केंद्रांवर धान खरेदीची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.

यंदा मिळणार १९४० रुपये प्रतिक्विंटल दर

शासनाने यंदा धानाचा हमीभाव निश्चित केला असून सर्वसाधारण धानाला प्रतिक्विंटल १९४० दर जाहीर केला आहे. त्यामुळे या किमतीपेक्षा कमी दराने धानाची खरेदी करता येणार नाही.

Related posts