राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत…

171 Views

 

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Related posts