धान घोटाळा, रेती चोरीचे वाढते प्रकरण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आ.डॉ. परिणय फुके यांनी केली राज्यपाल यांच्याशी चर्चा

697 Views

 

प्रतिनिधि।

मुंबई/भंडारा। धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यामधे धान विक्री करतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामधे धान खरेदी केंद्रामध्ये बरीच अनियमितता आढळुन येणे, बारदाण्याअभावी शेतकऱ्यांच्या धानाची उचल होत नसणे, गोडाऊन नसल्याने उघड्यावरच धान ठेवायची वेळ येणे, धानाचे चुकारे, बोनस वेळेवर मिळत नसणे, पूरग्रस्त शेतकरयांना अजूनही मोबदला न मिळणे, मध्यप्रदेशातील सी ग्रेडचे धान ए ग्रेड दाखऊन शासनाची आर्थिक फसवणूक करणे आणि अशा अनेक विषयावर आ. डॉ. परिणय फुके यांनी अलीकडेच राज्याचे राज्यपाल मा.महामहीम भगतसिंहजी कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली.
भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात रेती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे.याबाबत आपण स्थानिक प्रशासन, मंत्रालयीन स्तरावर तसेच विधी मंडळामध्ये या प्रश्नांवर वाचा फोडून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही कुठलीही कार्यवाही न झाल्याने आपण यावर लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली. तसेच सर्वोच्च न्यायलायाच्या निर्णयामुळे ओ बी सी आरक्षण रद्द झाल्यामुळे राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीमध्ये समाजाचे नुकसान झाले असून राज्य शासनाने ओ बी सी आरक्षणाचा कायदा तातडीने मंजूर करावा यासाठी राज्य सरकारने ओबीसी आयोग तयार करून जिल्हा व गावनिहाय माहिती अद्ययावत करावी व यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी, याकरिता आपण राज्य सरकारला याबाबत सूचना कराव्यात अशी विनंती आ. फुके यांनी चर्चेदरम्यान राज्यपाल यांच्याकडे केली. या सर्व प्रश्नांवर आपण स्वतः जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू असे आश्वासन मा.राज्यपाल यांनी आ. परिणय फुके यांना दिले.

Related posts