केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनात, “गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकावर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुरस्कार देऊन केले कौतुक..

949 Views

 

गोंदिया। केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात २ लाख ८५ हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. या योजनेच्या टप्पा-२ अंतर्गत विभागातील जास्तीत-जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वेळेत नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या.

      केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष २०२२-२३) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्रीमती बिदरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभघाटे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम.,विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे,आस्थापना उपायुक्त विवेक इलमे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील सरपंच, पंचायत समिती सभापती,तहसिलदार,गटविकास अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती बिदरी म्हणाल्या, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी  देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३  हजार घरकुल उभारण्यात आली. उर्वरित १२ हजार घरकुलांचे उद्दिष्टयही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १५ सप्टेंबर रोजी ‘प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-दोन’ अंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ वितरीत होणार आहे. नागपूर  विभागातील ८० हजार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातही हा लाभ जमा होणार आहे. त्यासाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांनी १०० टक्के नोंदणी केल्याचे सांगत उर्वरित जिल्हयांनी तातडीने नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले.  पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेतंर्गत विभागात १४ हजार ८०० भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित ४०० लाभार्थ्यांनाही लवकरच जागा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याला प्रथम, भंडारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुरुगानंथम एम. यांनी गोंदिया जिल्ह्याचा तर गंगाधर जिभकाटे यांनी भंडारा जिल्ह्याचा पुरस्कार स्वीकारला.

राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीतही गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. चंद्रपूरला द्वितीय तर वर्धा जिल्ह्याला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.

        तालुक्यांमध्ये रामटेकची सरस कामगिरी

             केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याने सरस कामगिरी केल्यामुळे या श्रेणीतील दोन्ही पुरस्काराने या तालुक्यास  सन्मानित करण्यात आले. केंद्र पुरस्कृत  योजनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीने पहिला, गोंदिया पंचायत समितीने दुसरा तर रामटेक पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकाविला.

            राज्यपुरस्कृत योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समितीला प्रथम क्रमांकाच्या, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीला दुसऱ्या तर रामटेक पंचायत समितीला तिसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

 ग्रामपंचायत श्रेणीत वर्धा जिल्हा अव्वल

केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गौरविण्यात आलेल्या एकूण ६ पैकी वर्धा जिल्ह्यातील  ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. केंद्र पुरस्कृत आवास योजनेत वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील  काजळी ग्रामपंचयतीला  प्रथम तर  आष्टी तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील राजगड ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील दोंदुडा ग्रामपंचयतीला प्रथम तर आष्टी तालुक्यातील दैलवाडी ग्रामपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाच्या आणि कारंजा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तालुक्यांची बाजी

शासकीय जागा उपलब्धता व वाळूच्या उपलब्धतेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या केंद्र पुरस्कृत आवास योजनेंतर्गत तालुक्यांच्या श्रेणीत  गोंदिया तालुक्याला प्रथम क्रमांकाचा, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्याला द्वितीय तर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

 याश्रेणीत राज्य पुरस्कृत योजनांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट प्रथम तर समुद्रपूर तालुक्याला  द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने आणि गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्याला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.

              केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव मुक्त वसाहत योजना आदी ग्रामीण गृह निर्माण योजना राज्यभर राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा व तालुक्यांना २० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतीमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी पुरस्काराने गौरविण्यात येते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी तर सूत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी आणि  विकास विभागाच्या सहायक आयुक्त स्वाती इसाये यांनी आभार मानले.

Related posts