24 ऑगस्ट/वार्ताहार
गोंदिया: ओबीसी वसतिगृहे सुरू करण्यासाठी तारखांवर तारीख देणाऱ्या सरकारच्या धोरणाला कंटाळून आेबीसी संघटनांनी सोमवार(दि.१९) व गुरुवारी (दित २२) निवेदनाच्या माध्यमातून सज्जड दम भरला. तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाराची दखल अखेर घेण्यात आली असून, भाड्याने घेतलेल्या इमारतीत साहित्यांची जुळवाजुळव सुरू असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद मोहतुरे यांनी प्रत्यक्ष वसतिगृहात ओबीसी पदाधिकारी व पालकांसोबत पाहणी करतांना सांगितले. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१५ ऑगस्ट २०२३, १५ सप्टेंबर २०२३, १५ ऑक्टोबर २०२३, १५ नोव्हेंबर २०२३ आणि नंतर २८ मार्च २०२४ पासून आेबीसी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे सुरू होतील, असे आश्वासन सरकारने सभागृह आणि सभागृहाबाहेरही दिले होते. परंतु, या आश्वासनांची पूर्तता काही केली नाही. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.
इतकेच नव्हे, तर नागपूर येथील ओबीसी वसतिगृहाचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी ओबीसी विद्यार्थ्यांनी केले. यात राजशिष्टाचार पाळला गेला नाही असे कारण दाखवून ओबीसी समाजातील नागपूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक राजेंद्र भुजाडे यांचे राज्य सरकारने निलंबन केले. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील आेबीसी बांधवांनी गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठत आपला आक्रोश व्यक्त केला. तसेच शुक्रवारी (ता. २३) वसतिगृहे ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा दिला होता. या इशाराची दखल अखेर घेण्यात आली आहे. गणेशनगर येथील वसतिगृहाच्या इमारतीसमोर जमलेल्या आेबीसी बांधवांना सहायक संचालक विनोद मोहतुरे यांनी येत्या आठ ते दहा दिवसांत आेबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू केले जाईल. तशी तयारी सुरू असून, साहित्याची जुळवाजुळव सुरू असल्याचे सांगितले तसेच पत्र सुध्दा दिले. ओबीसी मुलींच्या वसतिगृहात ५३, तर ओबीसी मुलांच्या वसतिगृहात २५ मुलांचे अर्ज पात्र ठरल्याचीही माहितीही यावेळी त्यांनी दिली. १ सप्टेंबरपासून वसतिगृह कुठल्याही स्थितीत सुरू झाले पाहिजे, अन्यथा आंदोलन केले जाईल, अशी भूमिका आेबीसी बांधवांनी यावेळी घेतली.
यावेळी खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे, राजीव ठकरेले, ऋषीकांत साहू, उमेंद्र भेलावे, एन. टी. निमकर, सावन डोये, प्रेमलाल साठवणे, नरेश परिहार, सुनील भोंगाडे, अशोक पडोळे, उमेश कटरे, रवी पटले, दुर्गेश येल्ले, सुरेश ठाकरे, नानू चौधरी, भूवन रिनायत, संतोष भेलावे, धरमलाल मस्करे, नारायण राऊत, ओमकार पटले, दिलीप गायकवाड, सुरेश तरंडे, तुळशीराम
पाथोडे यांच्यासह ओबीसी अधिकार मंच, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी सेवा संघ, बहुजन युवा मंचचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.