माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी शासन दरबारी केली होती मुदत वाढवून देण्याची मागणी..
गोंदिया.(28फेब्रूवारी)
पूर्व विदर्भातील धान उत्पादक गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील येथे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकांचे बंपर उत्पादन केले. मात्र मुद्दतवाढ संपल्यानंतर शासकीय आधारभूत भावाने धान खरेदी होत नसल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांना बाजारात विक्री करावे लागत होते.
या संदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन खरीप हंगामातील धानाची खरेदी आधारभूत किंमतीत 31 जानेवारीपासून वाढवून 31 मार्च पर्यंत करून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.
फुके यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या मागणीची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत धान खरेदीची मुदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानुसार, सरकारने आता खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो 31 मार्च 2024 पर्यंत वाढवला आहे.
विशेष म्हणजे राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत आत्तापर्यंत कमी धानाची खरेदी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याचा निर्णय देऊन वाढीव दिलासा दिला आहे.