आगामी लोस/विस निवडणुका साठी 70 वर्षीय धावक मुन्नालाल यादव यांची ‘जिल्हा दूत’ म्हणून नियुक्ति

317 Views

 

उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन

गोंदिया,दि.24 : भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी 1950 हा दरवर्षी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी मतदारांना, विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करुन घेणे या उद्देशाने दिनांक 25 जानेवारी 2024 हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाची ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ ही थीम आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व मतदान केंद्रावर 25 जानेवारी 2024 रोजी 14 वा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येत असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता 14 वा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमास मुन्नालाल यादव गोंदिया, वय-70 वर्षे, 5000 मिटर धावक व LONG JUMP (India Master Athletics) राष्ट्रीय चैंपियन ज्यांची आगामी लोकसभा/ विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 च्या अनुषंगाने ‘जिल्हा दूत’ (District Icon) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार असून मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट झालेल्या 18 ते 19 या वयोगटातील नविन मतदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदान ओळखपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांनी कळविले आहे.

Related posts