2,156 Views
गोंदिया, 13 जानेवारी
माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर 11 जानेवारी रोजी अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चार आरोपींना चोवीस तासात अटक केली असून न्यायालयाने त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
याप्रकरणातील दोन मुख्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाने आज, 13 जानेवारी रोजी पत्रपरिषदेत दिली.
पत्रपरिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा उपस्थित होते.
याप्रकरणी माहिती देताना त्यांनी सांगितले, माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव हे यादव चौकातीलच तलाव काठावरील मंदिरातून पूजापाठ करून घरी येत असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी देशी कट्ट्यातून यादव यांच्यावर मागून गोळी झाडली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थित आहे.
याप्रकरणी पोलिस प्रशासनाने वेगवेगळी पथक तयार करुन आरोपींच्या शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लोकेश यादव याच्यावर गोळी चालविणारा आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (21, रा.भिंडी ले आऊट नागपूर), अक्षय मधुकर मानकर (29) कळमेश्वर) यांना नागपूर येथून ताब्यात घेतले. तसेच गंगाझरी जंगलातून धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत (32 रा.कुंभारेनगर) व गोंदिया येथून नागसेन बोधी मंतो (41, रा.श्रीनगर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून लोकेश यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुलीही दिली. तसेच प्रशांत मेश्राम रा.गौतमबुद्ध नगर व रोहीत मेश्राम रा.ह.मु.कळमेश्वर यांच्या सांगण्यावरुन लोकेश यादव याच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. न्यायालयाने अटकेतील आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक दिनेश लबाडे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरु असून याप्रकरणात आणखी आरोपी असल्याची शक्यता वर्तविली आहे.