रावणवाडी पोलीस स्टेशन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पोलीस विभाग गतिमान करण्याच्या दृष्टीने 32 वाहनांचे लोकार्पण
गोंदिया, दि.२६ : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर लागुन असणारे उत्तर दिशेकडील सीमावर्ती भागातील गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे सीमेवरील शेवटच्या टोकावर असलेले रावणवाडी येथे सुसज्ज अशी पोलीस स्टेशनची नविन इमारत तयार करण्यात आलेली आहे. अशा या सुसज्ज इमारतीतून पोलीसींगच्या माध्यमातून जनतेला चांगली सेवा देण्यात यावी, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
27 ऑक्टोबर रोजी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या नविन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना श्री. आत्राम बोलत होते. आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, डॉ.अभिजीत वंजारी, तसेच जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर यावेळी मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांच्या मार्फत 4 कोटी 97 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा रावणवाडी पोलीस स्टेशन इमारतीचे तसेच पोलीस विभाग गतिमान करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त अनुदानातून एकूण 32 वाहनाचे आज पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री श्री. आत्राम म्हणाले, रावणवाडी येथील पोलीस स्टेशनच्या इमारतीचा फायदा या परिसरातील जनतेला नक्कीच होणार आहे. या पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी निर्भयपणे येवून आपल्या समस्यांचे निराकरण करावे. गुन्हेगाराला शिक्षा होवून सर्वसामान्य माणसाला सुरक्षा मिळाली पाहिजे असे पोलीस प्रशासनाने काम करावे. सर्वसामान्य माणसामध्ये पोलीसांबाबत विश्वास निर्माण झाला पाहिजे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करुन या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांना पोलीस व जनतेच्या समन्वयातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, पोलीस दल, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधीसोबत नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. पोलीस दलाने तत्पर राहून या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली.
आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक एक कर्तव्यदक्ष म्हणून जिल्ह्यात काम करीत आहेत. तसेच या इमारतीत काम करणाऱ्या पोलीस दलाने सुध्दा तत्पर राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्ह्यांवर आळा घालणे व जनतेच्या समस्यांचे निराकरण केले तर गोंदिया जिल्हा विकासाला निश्चित रुपाने पुढे जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार डॉ.अभिजित वंजारी म्हणाले, रावणवाडी पोलीस स्टेशनला ज्या इमारतीची गरज होती, ती इमारत आता तयार झालेली आहे. पोलीस दलाने अधिक सक्षमपणे काम करावे. पदभरती झाली पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे अशी आशा व्यक्त करुन सायबर क्राईम ही आज काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे म्हणाले, या पोलीस स्टेशनमध्ये लोकांना चांगली वागणूक देण्यात यावी. जनतेच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त प्रमाणात निपटारा करण्यात यावा. पोलीस दलाने लोकांना सहकार्य करण्यास नेहमीच तत्पर राहावे. या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जनतेला निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, नवनिर्मित रावणवाडी पोलीस ठाणे इमारतीचे बांधकाम 20,000 चौ.मी. एवढ्या क्षेत्रात असून प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी व प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या या पोलीस ठाण्यात 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक व 45 पोलीस अमलदार असे मनुष्यबळ कार्यरत आहे. सीमावर्ती भागातील सदर पोलीस ठाण्याचे ठिकाण लक्षात घेता, आंतरराज्य गुन्हे करणारे गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या तसेच आंतरराज्य मद्य, नशेचे पदार्थ, जनावरे अथवा शस्त्राची होणारी अवैध तस्करी यावर अंकुश बसण्यासाठी याद्वारे मदत होणार आहे. सदर पोलीस स्टेशन इमारतीत ठाणेदार कक्ष (पोलीस निरीक्षक), पोलीस उपनिरीक्षक कक्ष, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कक्ष, गोपनीय कक्ष, पोलीस निरीक्षक रायटर कक्ष, बिनतारी/दळणवळण कक्ष, कॉम्पॅक्टर कक्ष/दस्ताऐवज कक्ष, रायटर कक्ष, विद्युत कक्ष, स्टेशनरी कक्ष, तपास पथक कक्ष, पुरुष चौकशी कक्ष, पुरुष बंदीगृह, महिला बंदीगृह, गार्ड रुम, सी.सी.टी.एन.एस. कक्ष व आवक-जावक कक्ष कार्यरत असणार आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी 5 कि.मी. मिनी मॅराथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष गटात अमोल चचाणे, मिलिंदकुमार कोवे, रोहीत पटले, रितीक मस्करे, गुरुदेव दमाहे आणि महिला गटात सुषमा रहांगडाले, दिव्या मडावी, हिना मुनेश्वर, निशा ढगे, आरती भगत या खेळाडूंनी मॅराथॉन दौडमध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना मेडल देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजणे, रावणवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर, तहसिलदार समशेर पठाण, गृहनिर्माण विभाग कनिष्ठ अभियंता रोशन हिंगवे, सर्व पोलीस अधिकारी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी मानले.