गोंदिया: कार्यकारी अभियंता कार्यालयावर भाजपचा माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात मंगळवारला भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा

435 Views
प्रतिनिधि।
गोंदिया:(१३ फेब्रुवारी) महाविकास आघाडीचे खोटे आश्वासन,महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाचे व महावितरण कंपनीचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतकरी व शेतमजुर अडचणीत आले आहे.त्यामुळे मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने दि.१५ फेब्रुवारी २०२२ मंगळवारला टि-पॉईंट कोहमारा ते महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालय देवरी येथे शेतकऱ्यांच्या जनआक्रोश मोर्चा काढून कार्यालयास “ताला ठोको आंदोलन” करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इशारा देण्यात येणार आहे.
ऐन रब्बी हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये, शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या कारणाने तोडण्यात आलेले कृषी पंपाचे कनेक्शन त्वरित जोडावे,कृषी विज बिल पूर्णता माफ करण्यात यावे,कृषिपंपांच्या मीटरची रिडींग न घेता मनमर्जीने बिलाची आकारणी बंद करावी. तसेच कृषीपंपाचे नादुरुस्त मीटर त्वरित दुरुस्त करून रिडींग प्रमाणे विजेची आकारणी करण्यात यावी.ज्यानी डिमांड भरला परंतु अजूनही मीटर लावण्यात आले नाही अशा प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांना डिमांड मागणीनुसार मीटर लावुन द्यावेत.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे गडचिरोली जिल्हा प्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा. या मुख्य मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी अर्जुनी-मोर विधानसभातर्फे शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा काढून महावितरण कार्यालयात ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर मोर्चा टि-पॉईंट कोहमारा येथुन महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालय देवरी येथे निघणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्यासोबत जिल्ह्यातील भाजपचे नेते, अर्जुनी-मोर,सडक अर्जुनी,गोरेगाव भाजपचे तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी,कार्यकर्ता व शेतकरी,शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप अर्जुनी/मोर विधानसभाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts