GONDIA: देवरी, चिचगड होणार प्रकाशमान, 132 केव्ही उपकेंद्रासाठी आ. फुके यांचा पुढाकार..

198 Views

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

गोंदिय। जिल्ह्यातील देवरी येथे प्रस्तावित १३२ केव्ही वीज उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या भागात सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि उद्योजक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी देवरी येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे देवरी आणि चिचगड भागातील वीज समस्या लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या देवरी व चिचगड भागात कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वेळेवर भरत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पंपवरही याचा मोठा परिणाम होतो. शेतीला आवश्यक असलेल्या सिंचनाच्या वेळा चुकत असून घरगुती व औद्योगिक वीजपुरवठ्यातही व्यत्यय येतो.

या विषयावर आमदार डॉ. परिणय फुके यांनी अनेक वेळा संबधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असून, नागरिकांच्या सातत्याने वाढणाऱ्या तक्रारींचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली. देवरी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विशेषतः देवरी व चीचगडमध्ये उपकेंद्र उभारल्यास वीज दाबाचा प्रश्न कायमचा सुटेल, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेत ऊर्जाविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे देवरी व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी आणि इतर वीज गरजांसाठी स्थिर आणि पुरेसा पुरवठा होणार आहे.

आमदार डॉ. फुके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देवरी व चिचगड वीजप्रश्न मार्गी लागत असून, हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास संपूर्ण परिसर सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related posts