जातनिहाय जनगणनेसाठीच्या संघर्षाचा सन्मान — आ. डॉ. परिणय फुके यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्कार

242 Views

 

प्रतिनिधि।

नागपूर: देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देणाऱ्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा करत लढ्याला दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यानंतर ओबीसी समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

या निर्णयानंतर आमदार डॉ. फुके यांच्या हिलटॉप, नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी आमदार डॉ. फुके म्हणाले, “जातनिहाय जनगणना ही केवळ माहिती संकलनाची प्रक्रिया नसून, ती सामाजिक न्याय, हक्कांची पुनर्स्थापना आणि समतेच्या तत्वांची खरी अंमलबजावणी आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला योजनांचा खरा लाभ मिळवून देणे शक्य होईल. माझा सत्कार म्हणजे ओबीसी समाजाच्या दीर्घ संघर्षाचा गौरव आहे. या लढ्याचा मी एक भाग होतो, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.”

ते पुढे म्हणाले, “ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मी आभारी आहे. या लढ्यात सातत्य, जिद्द आणि एकत्रितपणा महत्त्वाचा ठरला. हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, याबाबत शंका नाही.”

या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी आमदार डॉ. फुके यांचे अभिनंदन करत, त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

उपस्थित मान्यवरांमध्ये महासंघाचे केंद्रीय सचिव शरदराव वानखडे, परमेश्वर राऊत, विनोद इंगोले, सुभाष घाटे, गुनेश्वर आरीकर, राहुल करांगळे, अनिल चानपूरकर, लीलाधर दाभे, वीरश्री चानपूरकर, अफसाना पठाण, सुरेश जिचकार, राहुल खैरकर, घनश्याम मांगे, सुरेश कोंगे, रंगराव गेचोडे, राजेश भुते, विनायक इंगळे, गणेश नाखले, गणेश गडेकर, अविनाश घागरे, सौरभ राऊत, विकी कैकाडे, अरुण कैकाडे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संयोजन ओबीसी महासंघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. यावेळी उपस्थितांनी “सामाजिक न्यायासाठीचा लढा अधिक बळकट करू” अशी शपथ घेतली.

Related posts