३० जूनला जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट, शाळा प्रारंभ दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक करा-जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

226 Views

गोंदिया, दि.27 :-  जिल्ह्यात नव्या शैक्षणिक सत्राला ३० जून पासून सुरुवात होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना ‘आनंददायी शिक्षण’ या हेतूने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवही तेवढाच आनंददायी व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व  शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पत्राद्वारे केले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून शाळेत “प्रवेशोत्सव” साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

     बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांचे आनंददायी पध्दतीने स्वागत करावयाचे आहे. ६ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची १०० टक्के पटनोंदणी होण्याच्या दृष्टीकोनातून शाळेच्या पहिल्या दिवशी ३० जून २०२३ ला महसूल विभागातील सर्व अधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांनी किमान २ शाळेला भेट द्यावी. शाळा प्रारंभ दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक करुन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने गती प्रदान करुया, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

          नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या स्वागतासाठी जिल्हयातील सुसज्य शाळांमध्ये मंगलमय उत्साहाच्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात येत आहे. या शाळांमध्ये जास्तीत जास्त बालके प्रवेश घेतील याकरिता सर्वांनी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांचे कौतुक व शिक्षकांना मार्गदर्शन करुन नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. नविन शैक्षणिक वर्षाच्या त्यांनी सर्वांना हार्दीक शुभेच्छाही दिल्या.

सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार -शिक्षणाधिकारी कादर शेख

        गोंदिया जिल्ह्यात पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व मिळून १६४५ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गुलाबपुष्प, रांगोळी, शाळा सजावट, गणवेश वाटप, पुस्तक वाटप, शालेय पोषण आहारात मिष्ठान्न वाटप अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस कायम स्मरणात राहील या दृष्टीने शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यासाठी शिक्षण विभाग उत्सुक असल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले.

Related posts