ईद-ए-मिलाद साध्या पध्दतीने साजरा करा – जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना

231 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया दि.28 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोंबर रोजी येणारा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जूलूस मुस्लिम बांधवांनी साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.
कोव्हिड-19 च्या पार्श्वभुमीवर ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) हा सण इतर धार्मिक सणांप्रमाणेच आपआपल्या घरात राहूनच साजरा करण्यात यावा. तसेच राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) सणाचे मिरवणुकीला परवानगी राहणार नाही. परंतु प्रतिकात्मक स्वरुपात काढण्यात येणारे मिरवणुकीस परवानगी असेल. त्याअनुषंगाने पोलीस प्रशासनाची पुर्व परवानगी व नाहरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे बंधनकारक राहील.
सदर मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधित नगर पालिका, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. सदर पंडालमध्ये कमाल 5 व्यक्तींच्या मर्यादेत उपस्थितीस परवानगी असेल.
सदर धार्मिक सणामध्ये धार्मिक प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करतांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावे. तसेच केबल, टि.व्ही., वेबसाईट, फेसबुक लाईव्ह, इत्यादी चे माध्यमातुन थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यक्तीमध्ये भौतिकदृष्टया कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी. कोविड-19 अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहिल. Containment Zone मधील व्यक्तींना तसेच Quarantine व Home Isolation मध्ये असलेल्या व्यक्तिना त्यांचे कालखंड पूर्ण होईपर्यंत सदरचे कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास प्रतिबंध राहिल.
सबील/पाणपोई- सदर सणानिमित्त ज्या ठिकाणी सबील पाणपोई लावण्यात येतील त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची, शहरी भागाकरिता मुख्याधिकारी न.प., ग्रामीण भागाकरिता तहसिलदार यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. सदर सबील (पाणपोई) स्थळी कमाल 5 व्यक्तींना उपस्थित राहणेस परवानगी राहील. सदर ठिकाणी सिलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील (पाणपोई) च्या ठिकाणी सामाजिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर, इत्यादी) पाळणे बंधनकारक राहील.
कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई असेल. गर्दीचे कार्यक्रमाऐवजी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, असे उपक्रम आयोजित करुन मलेरिया, डेंग्यु, कोरोना इ. आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. इतर दुकाने यांना सदरचे स्थळी पुर्णत: मज्जाव राहील.
संपूर्ण चाळीतील, इमारतीतील नागरिकांना एकत्रित येऊन धार्मिक सण साजरा करणेस पुर्णत: मनाई असेल. वरील प्रमाणे मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन करण्यास सदर आदेशांद्वारे सुचित करण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन, प्रशासनाकडून काही अतिरिक्त सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे सुध्दा अनुपालन करणे बंधनकारक राहील. सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती तसेच आस्थापना यांचेवर साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Related posts