उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांचा पुढाकार, पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य
गोंदिया,दि.26 (जिमाका) : महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड सीमेवर असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या पुढाकाराने अख्खे प्रशासन प्रथमच गावात गेले आणि योजनांचा लाभ दिला. अनेक विभागाचे अधिकारी गावात पाहून नागरिकही भारावून गेले होते. एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने गावकरी व प्रशासनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून महसुल प्रशासन तर्फे तहसील कार्यालय, आधार सेंटर सालेकसा, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, सालेकसा ग्रामपंचायत, दररेकसा, जमाकुडो, आणि गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी‘ या उद्देशाने मुरकूटडोह येथे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात साधारण 350 ते 400 स्थानिक लोक, परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवून जिल्हा परिषदेच्या 30 वेगवेगळ्या योजनांमध्ये नोंदणी केली. सोबतच महसूल विभागाशी संबंधित 8-9 सेवांचा त्यांना लाभ देण्यात आला. दुर्गम भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी व्हावा व जनतेनी मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने 25 एप्रिल 2023 रोजी सशस्त्र दुरक्षेत्र मुरकुटडोह येथे एक दिवसीय भव्य शिबीर आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराच्या तयारीसाठी महसूल विभाग, पोलीस विभाग तर्फे शिबिराच्या वास्तविक तारखेच्या 15 दिवस आधी सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी (योजनांसाठी आवश्यक असलेली ) पोलीस आणि तलाठ्यांना देण्यात आली. त्यांनी लोकांना सर्व कागदपत्रे गोळा करण्यास मदत केली. जेणेकरून लाभार्थी शिबिराच्या त्याच दिवशी नोंदणी करू शकतील.
महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन तर्फे आयोजीत प्रशासन आपल्या दारी या पोलीस “दादालोरा खिडकी योजना” आणि “शासकीय योजनांचा जत्रा” च्या माध्यमातून जनतेच्या मनात महसूल प्रशासन आणि पोलीस दल व प्रशासनाप्रती आपलेपणाची भावना निर्माण करण्यात आली. याशिवाय बाल विकास अधिकारी अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री, शिलाई मशिन योजना, संगणक प्रशिक्षण, टायपिंग प्रशिक्षण, जुडो कराटे प्रशिक्षण इत्यादी योजनेबद्दल युवक-युवतींना माहिती देण्यात आली.
दुर्गम भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून इतर गावांमध्ये सुध्दा महसूल विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दादालोरा खिडकी योजना आणि शासकिय योजनांची जत्रा उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अशीच शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.
अतिदुर्गम नक्षल प्रभावित आदिवासी भागात राबविलेल्या उपक्रमाचे जनतेनी कौतुक केले असून प्रशासनाचे आभार मानले आहेत. प्रशासनातर्फे आयोजित शिबीर कार्यक्रमात सहभागी, सर्व लाभार्थी नागरीकांचे, जनतेचे पोलीस व महसूल प्रशासनाने सुध्दा आभार मानले. त्याचप्रमाणे प्रशासनातर्फे यापुढे आयोजित शिबीर कार्यक्रमात सहभाग नोंदवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.