जनतेने कामालायक न ठेवल्याने विरोधकांकडून टिका, आमदार डॉ. फुके यांचा टोला : विरोधकांची स्थिती गोंळलेली

91 Views

 

नागपूर. गेल्या एका वर्षात महायुती सरकारने शेतकरीच नव्हे तर सामान्य जनतेसाठी अभूतपूर्व योजना आणून दिलासा देण्याचे काम केले. महायुतीचे सरकार दूरदृष्टीचे असून प्रामाणिक काम करीत आहे. सरकारवरील टिकेला कुठेही स्थान नाही. परंतु राज्यातील जनतेने काहीच काम दिले नाही. त्यामुळे विरोधक टिका करीत असल्याचा टोला आमदार डॉ. परिणय फुके यांनी लगावला. विरोधकांची एकूण स्थितीच गोंधळलेली, भरकटलेली आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. एका वर्षातील कार्यकाळातील माहिती देताना शेवटी त्यांनी ‘अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन हमने, अभी तो आसमा बाकी है…या शायरीतून जनतेच्या कल्याणाच्या सरकारच्या पुढील योजनांचे सुतोवाच केले.

आमदार डॉ. परिणय फुके विरोधकांनी मांडलेल्या २६० अंतर्गत प्रस्तावावर विधानपरिषदेत बोलत होते. आमदार डॉ. फुके यांनी मविआच्या दोन-अडीच वर्षांच्या कारभाराचे वाभाडे काढत सांगितले की, दोन वर्षाच्या तुमच्या सरकारने शेतकरी, जनतेला कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे विरोधकांना आमच्यावर बोलण्याचा काही अधिकारच नाही. आम्ही जे वचननाम्यात सांगितले, ते पूर्ण करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था पुढील पाच वर्षांत महायुती सरकार करणार आहे. २०२० मध्ये मविआचे सरकार होते. त्यावेळी अतिवृष्टी झाली, ओला दुष्काळाची स्थिती होती. परंतु मविआ सरकारने एक रुपयाची मदत केली नाही. आमच्या काळात अतिवृष्टी आली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभे राहीले. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस स्वत: शेतीच्या बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलले. ३१ हजार कोटींची नुकसानभरपाई दिली.

तुमच्या सरकारच्या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपयांचा बोनस दिला नाही. महायुती सरकारने दरवर्षी बोनस दिला. सामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या योजना आम्ही आणल्या.

पट्टेवाटप केले

महसूलमंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी २०११ पर्यंत जेवढे अतिक्रमित घरे होते. त्यांना नियमित करण्याचे काम करून ३० लाख जनतेला दिलासा दिला. झोपडपट्टीवासींना त्यांच्या मालकीचे घरे नव्हते. फक्त महापालिका निवडणुकीत त्यांना पट्टे देण्याचे स्वप्न दाखवले जात होते. त्यांचे स्वप्न भंग होत होते. या सर्व झोपडपट्टीवासींना मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणीस यांच्या सरकारने कायदे करीत पट्टे वाटप केले. आता केवळ एका अर्जावर मोजणीचा कोणताही खर्च न लावता त्यांना पट्टे मिळत आहे. फाळणीनंतर मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव भारतात आले. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. परंतु मालकी नव्हती. आज या सिंधी समाज बांधवांना जागेची मालकी देण्याचे काम आमच्या सरकारने केले. प्रत्येक घराला आखिवपत्रिका देण्यात आली.

या वर्षात लाडक्या बहिणींना १७ हजार कोटी

लाडकी बहिण योजनेवर टिका केली. या योजनेची बदनामी करण्यात आली. परंतु या बहिणींचे हात मजबूत करण्यासाठी महायुती सरकारने त्यांना मदत केली. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांतील काहीजण कोर्टात सुद्धा गेले. परंतु विधानसभा निवडणुकीत या बहिणींनी तिन्ही भावांना पुन्हा सत्तेत आणले. ही योजना बंद होईल, अशी अफवा विरोधक पसरवली. परंतु ही योजना त्यानंतरही सुरू असून यावर्षी २ कोटी ३८ लाख बहिणींना १७ हजार कोटी रुपये देण्याचे काम सरकारने केले.

पशुपालनाला कृषीचा दर्जा

पशुपालनाला कृषीचा दर्जा देण्याचे काम सरकारने केले. भंडारा जिल्ह्यात ५ लाख लिटर दूध दररोज होते. अतिवृष्टीने किंवा इतर कारणाने नुकसान मिळत नव्हती. आता पशुपालनाला कृषीचा दर्जा दिल्याने त्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार आरोग्याची काळजी घेत आहे. ९ ते १४ वर्षांच्या मुलींना सर्व्हाईकल कॅन्सरची (गर्भाशयाचा कॅन्सर) लस मोफत देणार आहे. तीन ते चार हजारांची ही लस आहे. हे सरकार संवेदनशील असून देशात प्रथमच अनाथ मुलांना १ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. नुकताच राज्यात ८३२ अनाथ मुलांना शासनाच्या सेवेत घेण्यात आले. त्यांचे पालकत्व स्वीकारण्याचे काम या सरकारने केले आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना दिलासा

संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, अपंगांना देण्यात येणारी पेंशन आता सहाशे रुपयावरून हजार रुपये करण्यात आली. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली. यात वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना ६० हजार रुपये देण्यात येणार आहे. शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या या मुलांचा खर्च आई-वडिलांना झेपत नव्हता. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपची स्थापना ज्या विचाराने केली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदयाची शिकवण दिली. त्यानुसार शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ज्या योजना आणल्या, जे उपक्रम राबवले. त्यातून शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचत आहे.

जनतेच्या आरोग्याची काळजी

आदरणीय देवेंद्र जी फडणवीस यांच्या पुढाकाराने गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना अभूतपूर्व मदत केली. लिव्हर ट्रान्सप्लांट, हृदय प्रत्यारोपणासाठीही पुढाकार घेतला. महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेतून २० ते २२ लाख रुपयापर्यंत मदत देण्यात येत आहे. कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देणाऱ्यासाठी स्वतंत्र आरोग्य धोरण तयार करण्यात आले आहे. अंधत्वमुक्त महाराष्ट्रासाठी दृष्टीयज्ञ योजना, १५ हजार पोलिसांची भरती केली. राज्य देशात ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे पहिले राज्य होत आहे, असे आमदार डॉ. फुके यांनी सांगितले.

Related posts