तिरोडा : अदानी फाऊंडेशन, तिरोडा यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून तिरोडा तालुक्यातील ४४ अंगणवाड्यांतील बालकांसाठी आवश्यक असलेले डेस्क-बेंच सेट उपलब्ध करून दिले आहेत. अंगणवाडीतील चिमुकल्यांना अधिक सोयीस्कर आणि प्रोत्साहनपर शैक्षणिक वातावरण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बालकांच्या आरोग्यासाठी व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे साहित्य वितरित करण्यात आले आहे. तालुक्यातील ४४ अंगणवाड्यांना एकूण २६४ डेस्क-बेंच सेट वाटप करण्यात आले असून, यामध्ये एकूण १५८४ खुर्च्या व १८४८ डेस्क पुरविण्यात आले आहेत.
![]()
हा महत्त्वपूर्ण उपक्रम अदानी पावरचे प्रमुख श्री. मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अदानी फाउंडेशनचे प्रमुख श्री. बिमूल पटेल यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वी झाला आहे.
या वाटप कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी केंद्र, खैरबोडी येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी: सरपंच विद्याताई टेंभरे या होत्या. यावेळी सर्व ४४ अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
सदर उपक्रम राबविल्याबद्दल बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. विनोद चौधरी यांनी अदानी फाऊंडेशनचे विशेष आभार मानले. त्यांनी फाऊंडेशनला धन्यवाद पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली. “अदानी फाऊंडेशनच्या या सहकार्यामुळे अंगणवाडी स्तरावरील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाधिकारी राहुल शेजव यांनी ही माहिती दिली असून, अंगणवाडी स्तरावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अदानी फाऊंडेशनचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अदानी फाऊंडेशन नेहमीच शिक्षण, आरोग्य आणि समाज कल्याणासाठी कार्यरत असते. या सोयीस्कर बैठक व्यवस्थेमुळे अंगणवाडीतील बालकांच्या शिक्षणात अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल.
