पंकज रहांगडाले यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडीत नर्सरी ते KG शिक्षणाचा नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी

119 Views

प्रायोगिक उपक्रमाला हिरवा कंदील, सर्वसाधारण सभेत निर्णय होणार.. 

गोंदिया / प्रतिनिधी : अंगणवाडीमध्ये विविध वयोगटातील बालकांना शिक्षण देताना त्यांच्या बुद्धीक्षमतेचा विचार करून शिक्षणाची पद्धत बदलण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी त्यांच्या तुमखेडा बु. गावात राबवला आहे. या प्रयोगाच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर, हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान १० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवावा, अशी मागणी रहांगडाले यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. या प्रस्तावाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी अनुमोदन देत, आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांची बुद्धीक्षमता आणि वयानुसार वेगळी असते. सक्षम पालक आपल्या मुलांना नर्सरी, KG १ आणि KG २ मध्ये शिक्षण देतात आणि नंतर त्यांचा इयत्ता पहिलीत प्रवेश होतो. मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांची मुले इयत्ता पहिलीचे वय पूर्ण होईपर्यंत अंगणवाडीत राहतात. जेव्हा ही मुले शाळेत जातात, तेव्हा त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागते आणि ते मागे पडतात. या समस्येवर उपाय म्हणून रहांगडाले यांनी तुमखेडा बु. गावात गावकऱ्यांना सोबत घेऊन एक अनोखा प्रयोग सुरू केला. त्यात बालकांना वयानुसार तीन गटांत विभागले – नर्सरी, KG १ आणि KG २. प्रत्येक गटासाठी योग्य पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. यामुळे ही मुले इयत्ता पहिलीत गेल्यावर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सहज स्पर्धा करू शकतील, असा विश्वास रहांगडाले यांनी व्यक्त केला.
या प्रयोगाच्या यशस्वीतेची दखल घेत रहांगडाले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा उपक्रम जिल्ह्यात विस्तारण्याची मागणी केली. “प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यात किमान १० अंगणवाड्यांमध्ये हा प्रयोग राबवावा आणि त्याचा अभ्यास करून जिल्हाभर लागू करावा,” असे ते म्हणाले. या प्रस्तावाला अध्यक्ष भेंडारकर आणि उपाध्यक्ष हर्षे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्याचे सांगितले.
रहांगडाले यांनी यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. या नव्या उपक्रमातून विद्यार्थ्यांप्रती त्यांची आपुलकी आणि शिक्षणाविषयीची कळकळ दिसून येते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ग्रामीण भागातील बालकांच्या शिक्षणात क्रांतीकारी बदल घडू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related posts