जिल्हयात शुभारंभ ; 138 दिवसांचा उपक्रम
प्रतिनिधि।
गोंदिया, ता. 1 : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने गावात दृश्यमान व शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी 1 मे पासून राबविण्यात येणाऱ्या ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या उपक्रमाचा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांत जिल्हयातील सर्व खासदार, आमदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त पोलिस मुख्यालयात ध्वजारोहनाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. त्यावेळी नागरीकांना संबोधीत करतांना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश हर्षे, जिल्हाधिकारी मा. श्री. प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मुरूगानंथम एम. जिल्हा पोलिस अधिक्षक मा. श्री. गोरख भामरे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मा. श्री. नित्यानंद झा, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. आनंदाराव पिंगळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. फरेंद्र कुतीरकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधुकर वासनिक, पाणी व स्वच्छता विभागाचे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ श्री. अतुल गजभिये, पाणी गुणवत्ता तज्ञ श्री मुकेश त्रिपाठी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी दिनांक 1 मे 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण 138 दिवस ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे गोंदिया जिल्हयात 886 गावे आहेत. या गावांत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 3317 नाडेप टाके तयार करण्यात आले. मोहिमेच्या कालावधीत गावातील नाडेप टाक्यात ओला कचरा टाकून त्यातून सेंद्रिय खताची निर्मीती केली जाणार आहे. गावांमध्ये नाडेप कंपोस्टींगचा स्वीकार वाढल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनात सुधार होईल. पर्यावरणपूरक उपाय योजना करण्यासाठी कचरा कमी करणे, कचऱ्याचा पूर्नवापर करण्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखता येईल. ग्रामस्थांचा स्वच्छता कार्यक्रमात सक्रिय सहभाग वाढल्यामुळे गावे सुध्दा स्वच्छ होतील. कचऱ्यापासून सेंद्रीय खतांची निर्मीती केल्यामुळे त्याचा फायदा गावातील नागरीकांना होणार आहे. 1 मे रोजी अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर जिल्हयातील 886 गावात वेगवेगळया ठिकाणात असलेल्या नाडेप टाक्या 10 मे पर्यंत भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. 11 मे पासून येत्या 30 ऑगस्ट पर्यंत भरलेल्या नाडेप टाक्याची देखभाल, प्रक्रिया आणि पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत नाडेप टाक्यांचा उपसा करून तयार झालेला सेंद्रीय खत शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
—–
अशी भरावी टाकी
सेंद्रीय खताच्या निर्मीतीला साधारणत: 120 दिवसांचा कालावधी लागतो. हे खत तयार करण्यापूर्वी नाडेप टाकीच्या तळाला पाणी शिंपडून गवताचा पातळ थर टाकावा. यावर ओला कचऱ्याचा 3 ते 4 इंचाचा जाड थर टाकावा. यानंतर शेण पाण्यात मिसळून शिपंडावे. पुढे 2 इंचाचा मातीचा थर करावा. अशी प्रक्रिया पाच ते सात वेळा नाडेप टाकी पूर्ण भरेपर्यंत करावी. शेवटी टाकीच्या वर दीड फूट उंचीचा डोम तयार करावा आणि त्याला शेणाच्या घट्ट मिश्रणाने लिंपण्यात यावे. पुढे खताची निर्मीती झाल्यानंतर त्याचा उपसा करावा.